गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 10:36 IST2025-05-17T10:35:23+5:302025-05-17T10:36:32+5:30
मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो असं राऊतांनी उत्तर दिले. त्यानंतर १० मिनिटांनी गृहमंत्री कार्यालयातून फोन आला, गृहमंत्रीजी बात करना चाहते है असं सांगितले.

गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
मुंबई - पत्राचाळ प्रकरणातील ईडी कारवाईवेळी संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. मला अटक करून सूड घ्या असं आव्हान राऊतांनी शाहांना केले होते. सुजित पाटकर, प्रवीण राऊत यांच्यावरील कारवाईमुळे संजय राऊत संतापले होते. नरकातला स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊतांनी अटकेआधी अमित शाह यांना फोन करून इतरांना कशाला छळता, मला अटक करून सूड घ्या असं म्हटल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
संजय राऊतांनी काय केले गौप्यस्फोट
पत्राचाळीसंदर्भात प्रवीण राऊत, सुजित पाटकरांच्या सीएवर एकाचवेळी धाडी पडल्या. १ फेब्रुवारी २०२३ रोजी धाडीनंतर प्रवीण आणि सुजित यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत दिल्लीत होते. त्याच रात्री १० वाजता संजय राऊतांनी अमित शाहांना फोन लावला. मला गृहमंत्र्यांशी बोलायचं आहे, मी संजय राऊत बोलतोय असा निरोप त्यांनी दिला. त्यानंतर १ मिनिट देता हू असं उत्तर समोरून मिळाले. त्यानंतर गृहमंत्री महत्त्वाच्या बैठकीत आहेत. मोकळे झाले की तुम्हाला फोन करतील असं सांगण्यात आले. अर्जंट है..असं राऊतांचे संभाषण ऐकून दिल्लीत उपस्थित असलेले मित्र हादरले. तुम्ही हे काय करताय असा प्रश्न मित्रांनी राऊतांना उपस्थित केला. त्यावर काहीच नाही, मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो असं राऊतांनी उत्तर दिले. त्यानंतर १० मिनिटांनी गृहमंत्री कार्यालयातून फोन आला, गृहमंत्रीजी बात करना चाहते है असं सांगितले.
शाह-राऊत यांच्यात काय झाला संवाद?
अमित शाह - संजयजी, बोलीये...आपने फोन किया था
संजय राऊत - अमितभाई आपले राजकीय भांडण आहे आणि त्यासाठी तुम्ही मला टार्गेट करू शकता.
अमित शाह - मै समझा नही..
संजय राऊत - मला टार्गेट करायचे असेल तर ह्या क्षणी मी दिल्लीत आहे. ईडीला सांगा, मला अटक करा, माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय, त्यानं काय साध्य होणार?, कारण नसताना मुंबईत माझ्या मित्रांवर धाडी घातल्या. त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेलेत
अमित शाह - संजयभाई, मुझे कुछ भी जानकारी नही, मै देखता हू...
संजय राऊत - सर, आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे.
या संवादानंतर अमित शाह यांनी फोन ठेवला आणि त्यानंतर लगेच ५ व्या मिनिटाला मुंबईहून आशिष शेलारांचा फोन आला. संजयजी, काय प्रकरण आहे? मला अमितभाईंचा फोन आला होता, समजून घ्या म्हणाले असं शेलारांनी राऊतांना म्हटलं. त्यावर आशिष गृहमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे. त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही. प्रवीण व सुजितला तूदेखील ओळखतो. माझे म्हणणं आहे, सरळ मला अटक करा आणि सूड घ्या, इतरांना कशाला छळताय. गृहमंत्री शाहांना फोन करून माझ्या भावना व्यक्त केल्या, तो संताप होता असं राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, धाडी सुरू असताना ईडीचे संचालक संजय मिश्रा पंतप्रधान कार्यालयात गेले. मिश्रांनी मुंबईतल्या धाडीसंदर्भात आणि माझ्या मुसक्या आवळण्यासंदर्भात मोदींना ब्रिफ केले. आम्हाला फार मोठं घबाड सापडलंय असे त्यांचे म्हणणं होते आणि ते पुढे फोल ठरले असा दावा संजय राऊतांनी पुस्तकातून केला आहे.