भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जाचक सुशोभीकरणाविरोधात रिक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:11 PM2021-11-15T21:11:03+5:302021-11-15T21:12:14+5:30

भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

the sanctity of rickshaw association movement against oppressive beautification outside Bhayander railway station | भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जाचक सुशोभीकरणाविरोधात रिक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात 

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जाचक सुशोभीकरणाविरोधात रिक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात 

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील अनावश्यक आणि जाचक ठरलेल्या ८ कोटींच्या सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊन वाहतूक कोंडी होत असताना आता सुशोभीकरणाच्या बांधकामात रिक्षांच्या मार्गिका नसल्याने रिक्षा रस्त्यावरच लागणार आहेत . त्यामुळे भविष्यात हा प्रश्न भीषण बनणार असून रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील याच उत्तरे कडील मार्गाने बाहेर पडतो . हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच ये - जा करतात . येथे रुंदीकरण म्हणून येथील बांधकामे आदी तोडण्यात आली . परंतु रुंदीकरण ऐवजी सुशोभीकरणचे मनमानी काम पालिकेने सुरु केले .  सुशोभीकरणाच्या कामासाठी २ कोटींचा प्रस्ताव तब्बल ८ कोटी रुपयांवर महापालिकेने नेला. पालिकेने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . त्यामुळे नागरिकांना येजा करणे अवघड झाले आहे . ह्या बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . 

प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे. दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते .  मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आहेच. 

या ठिकाणी सुरवातीला सुशोभीकरणाच्या आतील जागेत रिक्षांच्या दोन मार्गिका लागतील असे वाटले होते . परंतु प्रत्यक्षात मात्र पालिकेने रिक्षा साठी जागाच ठेवली नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व डॉ . बाबासहेब आंबेडकर मार्गा वर तसेच मोरवा आणि उत्तन अश्या चार मार्गावर रिक्षांच्या चार मार्गिका लागतात . परंतु सुशोभीकरणाच्या कामा मुळे आता रिक्षा ह्या मार्गिका ह्या कायमच्या भर रस्त्यात लागणार असल्याने रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे . वेळ पडल्यास रिक्षा बंद आंदोलन करू असा इशारा संघटनेचे रेमी डिसोझा व अन्य सहकारी यांनी दिला आहे . 

८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा अशी मागणी प्रवाशी तसेच नागरिक करत आहेत .

Web Title: the sanctity of rickshaw association movement against oppressive beautification outside Bhayander railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.