Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:22 IST2026-01-08T13:21:09+5:302026-01-08T13:22:53+5:30
Samruddhi Mahamarg News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर काही कामे पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद केली जाणार आहे. पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्गावरील वाहतूक ९ ते १३ जानेवारीदरम्यान काही ठिकाणी ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९० ५०० किमी ते १५० ३०० किमी येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम १० टप्प्यांत करण्यात येणार आहे.
या वेळेत समृद्धी महामार्ग राहणार बंद
गॅन्ट्री उभारण्याच्या कामाकरीता ९ जानेवारी रोजी मुंबई वाहिनीवर चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड व धोत्रा गावाजवळ दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ब्लॉक राहील. मांजरखेडजवळ नागपूर वाहिनीवर देखील दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान ब्लॉक राहील.
१० जानेवारी रोजी वाढोणा गावाजवळ नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४, चांदूर रेल्वे तालुक्यातील खंबाळा गावाजवळ मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान ब्लॉक राहील.
प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल.
कामामुळे वाहतुकीमध्ये बदल
अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या पट्ट्यात ९ ते १३ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत वाहतूक तात्पुरती थांबविली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम एकूण १० टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या किमी २०-५०० ते किमी ३०० या दरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामाच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाईल.