लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्र दिनापासून रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य केल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत गुरुवारी विशेष बैठक झाली. यावेळी रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठी भाषा येणे आवश्यक आहे. सुरुवातीला त्यांना किमान १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत, यासह इतर महत्त्वाच्या सूचना साहित्यिकांनी केल्या.
राज्यातील अमराठी/परप्रांतीय वाहनचालक हे मराठीत संवाद साधत नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेत पुढाकार घेतला आहे. अमराठी वाहनचालकांवर कोणतेही अनावश्यक दडपण न आणता, त्यांना खेळीमेळीच्या वातावरणात मूलभूत व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्यास तयार झाली आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाने हजारो स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, गरजेपुरती मराठी आली पाहिजे. कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून आम्ही ती १० वाक्ये लिहून दिली आहेत. ही भाषा सहज सोपी वाटली पाहिजे, असे मत ‘कोमसाप’चे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सांगितले.
वाहन चालकांना मराठी भाषेची सक्ती नाही; पण, त्यांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधावा. मराठीचा अभिजात भाषा म्हणून गौरव होत असताना मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे. वाहनचालकांनी मराठी भाषेचा अभ्यास करावा अशी अपेक्षा नाही तर व्यावहारिक पातळीवर मराठी बोलावे, याचा आग्रह आहे. याबाबतची छोटी पुस्तिका तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे गुगल-पे, फोन-पेच्या माध्यमातून मराठीचा वापर होईल, असे पाहिले जाईल, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यवाह प्रा. दीपा ठाणेकर यांनी सांगितले.
मुंबईसारख्या शहरात रिक्षाचालकांनी किमान व्यवहारासाठी तरी मराठी भाषा शिकली पाहिजे. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी १० सोपी वाक्ये शिकणे कठीण नाही. आम्ही स्वतः त्यांना शिकवायला तयार आहोत. ते जिथे सांगतील तिथे जाऊन मार्गदर्शन करण्याची आमची तयारी आहे. परवाना देताना किमान मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कवी
जेथे आपण राहतो, व्यवसाय करतो तेथील स्थानिक भाषा येणे अत्यावश्यक आहे. अमेरिकेत इंग्रजीशिवाय परवाना दिला जात नाही, त्याचप्रमाणे येथेही स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. व्यवसायाच्या दृष्टीने मराठी शिकणे गरजेचे आहे. भाषेबद्दल शत्रुत्व न ठेवता ती आत्मसात करणे गरजेचे आहे. अशोक चिटणीस, ज्येष्ठ लेखक
राजभाषा अधिनियमानुसार प्रत्येक राज्यात येणाऱ्या व्यक्तीने तेथील भाषा वापरणे गरजेचे आहे. माझ्या मते शासनाने मराठीबाबत कोणताही दबाव आणलेला नाही. त्यांनी मराठी भाषा बोलण्यासाठी व संपर्कासाठी वापरायला हवी. शिवाजी गावडे, लेखक
Web Summary : Maharashtra emphasizes Marathi for auto/taxi drivers. Training programs will teach basic Marathi, ensuring better communication with passengers. No fees will be charged for the training. The goal is practical Marathi usage, not strict enforcement.
Web Summary : महाराष्ट्र ऑटो/टैक्सी चालकों के लिए मराठी पर जोर देता है। प्रशिक्षण कार्यक्रम बुनियादी मराठी सिखाएंगे, जिससे यात्रियों के साथ बेहतर संवाद सुनिश्चित होगा। प्रशिक्षण के लिए कोई शुल्क नहीं लिया जाएगा। लक्ष्य व्यावहारिक मराठी उपयोग है, सख्त प्रवर्तन नहीं।