राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 05:41 IST2025-11-28T05:41:06+5:302025-11-28T05:41:38+5:30
विधानसभा निवडणुकीदरम्यान समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वरळी व माहीममध्ये त्यावेळी मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता.

राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
मुंबई - उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ११:३० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन तास बंद दाराआड झालेल्या बैठकीत आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकीत एकमेकांसमोर नव्हे तर एकमेकांसाेबत राहून महायुतीला थोपविण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत.
मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी मनसेने महत्त्वाच्या जागांवर दावा केला आहे. त्यानंतर मनसे व उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली. यात सुमारे ८० जागांवर मनसे आग्रही आहे. तर, २०१७च्या आकडेवारीवर आधारित वाटप व्हावे, अशी उद्धवसेनेची भूमिका आहे. यातील काही ठिकाणी दोन्ही पक्ष आग्रही असल्याने जागावाटपात तिढा निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी राज यांच्या भेटीला उद्धव गेले होते. संभ्रम असलेल्या जागांबाबत दोन्ही बंधू प्रत्यक्ष बसून निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वरळी व माहीममध्ये त्यावेळी मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती न होता मराठी मतदारांना एकत्र आणणे, मुंबईतील बदललेली परिस्थिती, भाषा वाद तसेच एकमेकांची ताकद अजमावण्यापेक्षा परस्परांना पूरक कसे होऊ, यावर दोन्ही नेते भर देत आहेत, असा दावा सूत्रांनी केला.
निवडणूक पुढे गेल्यास?
महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेण्यास उद्धव ठाकरे अनुकूल आहेत. मात्र, त्याला काँग्रेसचा विरोध आहे. आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचे एकत्रीकरण करण्याबाबत व मनपा निवडणूक पुढे ढकलल्यास त्याची रणनीती काय असावी, यावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.