"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:39 PM2024-05-24T20:39:45+5:302024-05-24T20:42:10+5:30

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Pune Accident: truth about the alleged video of 'pune accident accused' came out | "मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागला. या प्रकरणाने सध्या चांगलाच जोर पकडला आहे. याप्रकरणी आरोपी 'बाळा'सह त्याचे वडील आणि आजोबांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर व्हायरल झालेल्या आरोपीच्या व्हिडिओबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

तो व्हिडिओ आरोपीचा नाहीच...
अपघाताच्या घटनेनंतर गुरुवारी (23 मे) अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एक रॅप साँग गात असल्याचे दिसले. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. झालेल्या घटनेचा आरोपीला थोडाही पश्चाताप नसल्याचे अनेकांनी म्हटले. काही इलेक्ट्रनिक माध्यमांनीही हा व्हिडिओ सर्वत्र दाखवला. पण, आता तो व्हिडिओ आरोपी तरुणाचा नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याने समोर येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचे नाव आर्यन नीखरा आहे. तो दिल्लीतील रहिवासी असून, सोशल मीडियावर कंटेट क्रिएट करतो. पुण्यातील घटनेतून आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी त्याने घटनेबाबत रॅप व्हिडिओ तयार केला होता. प्रकरण वाढत असल्याचे पाहून अखेर त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले. आर्यन नीखराने इन्स्टा स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये त्याने फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवल्याचे सांगितले. तसेच, त्याने फेक न्यूज देणाऱ्या माध्यमांवर ताशेरेही ओढले. 

'बाळा' च्या वडिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला 4 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले होते. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर विशालला सत्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ती संपल्याने पुन्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आज सत्र न्यायालयाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Web Title: Pune Accident: truth about the alleged video of 'pune accident accused' came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.