खरोखरच पेट्रोल टंचाई की तेल कंपन्यांकडून निर्मित? लोकांमध्ये का पसरतेय अफवा? पेट्रोलपंप चालकांकडून मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:02 IST2026-03-25T09:59:10+5:302026-03-25T10:02:16+5:30
Petrol, Diesel Fuel Shortage Truth news: कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई. मिरज डेपोतून इंधन पुरवठा विस्कळीत. आखातातील युद्धाचा परिणाम की दरवाढीची शक्यता?

खरोखरच पेट्रोल टंचाई की तेल कंपन्यांकडून निर्मित? लोकांमध्ये का पसरतेय अफवा? पेट्रोलपंप चालकांकडून मोठा गौप्यस्फोट
- हेमंत बावकर
आखातात भयंकर युद्ध सुरु आहे. या युद्धाला महिना लोटणार आहे. अशातच जगभरात इंधन टंचाई जाणवू लागली आहे. इराणसोबत कित्येक दशकांपासूनचे चांगले संबंध असल्याने भारत होर्मुझ सामुद्रधुनीमधून कच्चे तेल आणि एलपीजीचे टँकर बाहेर काढण्यात यशस्वी ठरला आहे. तरीही अद्याप २० हून अधिक जहाजे या युद्धाच्या नाकेबंदीत अडकलेलीच आहेत. अशातच भारताने ४१ देशांकडून मिळेल तितका साठा मागविण्यास सुरुवात केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले आहे. तसेच युद्ध आणखी ताणले गेले तर कोरोनासारखी परिस्थिती ओढविण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सिंधुदूर्गात अघोषित पेट्रोल, डिझेल टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन या अफवा असल्याचे सांगत असले तरीही जमिनीवरील परिस्थीती काही वेगळेच सांगत आहे.
कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना सध्या विचित्र परिस्थितीचा अनुभव येत आहे. तेथील पेट्रोल पंप सात-आठ किंवा त्यापेक्षा जास्त काळ ड्राय म्हणजे त्यांचा पेट्रोल, डिझेल साठा संपत आहे. यामुळे लोक पेट्रोल आल्याचे समजताच पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत. कोल्हापुरात प्रशासनाने लोक अफवांमुळे रांगा लावत असल्याचे सांगितले आहे. अनेकांनी हातातली कामे सोडून पेट्रोलसाठी रांगा लावल्या होत्या. तरीही त्यांना टाकी फुल करता आली नाही, कारण पेट्रोल पंपांनी प्रत्येकाला दोन लीटरच पेट्रोल दिले.
या चारही जिल्ह्यांना मिरजमधील भारत पेट्रोलिअम, एचपी आणि इंडियन ऑईल यांच्या ऑईल डेपोंमधून पेट्रोल, डिझेल पुरविले जाते. या ऑईल डेपोंमधूनच या पेट्रोल पंपांना पुरेसे पेट्रोल, डिझेल दिले जात नसल्याचे समोर येत आहे. सिंधुदूर्गातील भारत पेट्रोलिअम आणि इंडियन ऑईल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांसाठी इंधन आणण्यासाठी सोमवारी पहाटेपासून टँकर या डेपोंबाहेर वाट पाहत थांबलेले आहेत. मंगळवार दुपार झाली तरी ते कंपन्यांनी भरलेले नाहीत. असेच टँकर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरीतील पेट्रोल पंपांचे देखील आहेत. परंतू, कंपन्यांना या पेट्रोल पंपांनी आगाऊ पैसे भरून, चलन निघूनही त्यांचे टँकर भरत नाहीत. यामुळे पेट्रोल पंप ड्राय पडत आहेत.
सध्या पेट्रोल पंपांवर ऑनलाईन प्रणाली असल्याने कंपन्यांना त्यांच्याकडे स्टॉक किती आहे, हे समजते. संपायला आले की कंपन्या एक टँकर भरतात आणि पाठवून देतात. हा टँकर सिंधुदूर्गात येईपर्यंत आठ ते नऊ तासांचा वेळ लागतो. तोवर या पंपांवरील पेट्रोल, डिझेलचा स्टॉक संपलेला असतो आणि ते ड्राय पडलेले असतात. पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याच्या शक्यतेने कंपन्या असे करत असल्याचे सिंधुदूर्गातील काही पेट्रोल पंप चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
दर वाढणार?
आखातात युद्ध पेटल्याने कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या देशात पाच राज्यांत निवडणुका आहेत, यामुळे इंधनाच्या दरांत वाढ होण्याची शक्यता कमी असली तरी देखील वाढलेले दर कंपन्यांना मोठे नुकसान करणारे आहेत. यामुळे कंपन्या दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.