पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी विशेष पोलिसांच्या नेमणुकीचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 06:00 AM2020-04-04T06:00:00+5:302020-04-04T06:00:06+5:30

सध्या राज्यामध्ये सर्वत्र पोलिसांना दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांचा तपास, आरोपपत्र तयार करण्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आणि जमावबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम करावे लागत आहे..

Option to appoint special police to reduce the stress on the police | पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी विशेष पोलिसांच्या नेमणुकीचा पर्याय

पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी विशेष पोलिसांच्या नेमणुकीचा पर्याय

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलीस आयुक्त, अधीक्षक आणि दंडाधिकाऱ्यांना अधिकारआपत्कालीन परिस्थितीत होऊ शकते नियुक्ती

लक्ष्मण मोरे - 
पुणे : देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे . दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असून महाराष्ट्रात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलावर प्रचंड ताण आला आहे. पोलिसांना अहोरात्र काम करावे लागत आहे. पोलिसांवरचा हा ताण कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात  ह्यविशेष पोलिसांह्णची नेमणूक करावी अशी मागणी काही आजी माजी पोलीस अधिकारी करीत आहेत.
 सध्या राज्यामध्ये सर्वत्र पोलिसांना दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांचा तपास, आरोपपत्र तयार करण्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आणि जमावबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम करावे लागत आहे. मुळातच पोलीस ठाण्यांना अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये काम करावे लागते. अनेक पोलिसांना रक्तदाब, मधूमेह, हृदयरोगासारखे आजार आहेत. अनेकांची शारीरिक स्थिती चांगली नाही. अनेकांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पोलिसांना आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.  
 ' महाराष्ट्र पोलीस अधिनियमा' मधील कलम २१ चा वापर करुन तात्पुरत्या स्वरुपात ' विशेष पोलिसां' ची नेमणूक करण्यात येऊ शकते. कोणत्याही शहराचे पोलीस आयुक्त अथवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा दंडाधिकारी अशा तिघांनाही हे अधिकार आहेत. त्यांना आपल्या अधिकार क्षेत्रातील हद्दीमध्ये कोणताही दंगा, गंभीर स्वरुपाचा शांतता भंग होण्याची शक्यता वाटल्यास, किंवा पोलीस दल रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी व मालमत्तेच्या संरक्षणासाठी अपुरे पडत आहे असे वाटल्यास किंवा आपत्काल परिस्थितीमध्ये पोलीस दलाला मदत करण्यासाठी विशेष पोलिसांची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत. त्यांना योग्य वाटेल अशा १८ ते ५० वर्षे वयोगटातील धडधाकट पुरुषाची स्वत:च्या सही-शिक्क्यानिशी दिलेल्या प्रमाणपत्राद्वारे विशेष पोलीस अधिकारी म्हणून ठराविक कालावधीकरिता नेमणूक करता येऊ शकते.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांवर येणारा ताण कमी करण्यासाठी समाजातील चांगल्या माणसांची मदत घेऊन त्यांना तात्पुरत्या स्वरुपात पोलीस म्हणून नेमण्याचा हा उपाय अंमलात आणण्याची आवश्यकता काही निवृत्त पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे.  या विशेष पोलिसांना मुळ पोलीस अधिका-यांना असलेले अधिकार व विशेषाधिकार असतात. तसेच जी उन्मुक्ती, कर्तव्ये आणि जबाबदारी असेल तेच सर्व या विशेष पोलिसांनाही मिळेल. त्यांना विना वेतन अथवा मानधनावरही नियुक्त करता येऊ शकते.
गेल्या काही दिवसात पोलिसांवरील ताण वाढल्याने त्यांचीही चिडचिड होताना पहायला मिळत आहे. नागरिकांसह शासकीय सेवेतील व्यक्तींनाही पोलिसांकडून मार खावा लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच त्यांना किमान साप्ताहिक सुट्या, आजारपणासाठी तरी या विशेष पोलिसांच्या नेमणुकीमुळे सुट्या घेता येऊ शकतात. यासोबतच भविष्यातील संभाव्य कायदा सुव्यवस्थेचा विचार करता या मनुष्यबळाची आवश्यकता उपयोगी ठरु शकतो.
=======
काश्मिरमध्ये पोलिसांच्या मदतीकरिता अशा विशेष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते.  महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीसह नक्षलग्रस्त भागात अशा प्रकारच्या नेमणूका केल्या जातात. परंतू, उर्वरीत महाराष्ट्रात या कलमाचा फारसा वापर झालेला नाही. किंबहुना तशी आवश्यकता यापुर्वी भासली नसावी.
- प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक
======
४१सध्या नागरि क कोरोनाच्या भीतीखाली आहेत. लॉकडाऊनमुळे घरी बसून आहेत. परंतू, पोलीस रस्त्यावर आहेत. पोलिसांना त्यांच्या कुटुंबाला एरवीही वेळ देता येत नाही. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला एकमेकांकडून मानसिक आधाराची गरज असते. सद्यस्थितीमध्ये पोलिसांवरचा ताण कमालिचा वाढला असून त्यांना मानसिक थकवा आलेला आहे. यासोबतच फिल्डवर काम करीत असल्याने आजाराची भीती आहेच. आरोग्याच्या समस्या आहेत. पोलिसांवरील ताण कमी करण्याकरिता त्यांना सुट्या मिळण्याकरिता विशेष पोलीस अधिका-यांची नेमणूक केल्यास त्याचा फायदा होईल. यामधून एक चांगला प्रघात पडू शकतो.
- राजेंद्र भामरे, निवृत्त सहायक  पोलीस आयुक्त

Web Title: Option to appoint special police to reduce the stress on the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.