मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 05:43 IST2026-05-18T05:43:27+5:302026-05-18T05:43:47+5:30
‘पुणे ॲग्रो हॅकॅथान २०२६’ पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा येत्या ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा समाजासाठी राज्य सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जेवढे काम केले, ते महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही सरकारने केले नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
‘पुणे ॲग्रो हॅकॅथान २०२६’ पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा येत्या ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेक मराठा तरुण आयएएस, आयपीएस आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवित आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार झाले आहेत. शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि निर्वाह भत्ता योजना सुरू असून, कोणतीही योजना बंद नाही. ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी निर्वाह भत्त्याची योजना आहे. नवीन हॉस्टेल तयार करत आहोत. जे प्रमाणपत्र मागितले जाते, त्यातील जे प्रमाणपत्र नियमात बसते, ते प्रमाणपत्र दिले जाते. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या निकषांनुसारच काम सुरू आहे. समितीमध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. सातारा गॅझेटसंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने कायदेशीर सल्ल्यानुसारच सरकार काम करत आहे.
राज्यात ऊर्जा संकट नाही
राज्यात कुठलेही ऊर्जा संकट नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक वीज उपलब्ध आहे. काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे तात्पुरती समस्या निर्माण होते. मात्र, संपूर्ण पुरेशी वीज उपलब्ध आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, अमलीपदार्थांचे संकट हे केवळ महाराष्ट्रासमोर नसून संपूर्ण देशासमोर आहे.
देशभर ड्रग्जविरोधी मोहीम सुरू असून, महाराष्ट्र त्यात अग्रस्थानी आहे. महाराष्ट्राची तुलना उडता पंजाबशी करणे चुकीचे आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न योग्य नाही. राज्यात राष्ट्रवादी (अजित पवार) आमचा मित्र पक्ष आहे.