दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे जेल भरो

By Admin | Updated: September 4, 2015 00:51 IST2015-09-04T00:51:35+5:302015-09-04T00:51:35+5:30

आजवरच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत, परतीचा पाऊस नीट झाला नाहीतर आणखी गंभीर अवस्था होऊ शकते,

NCP's jail for drought victims | दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे जेल भरो

दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे जेल भरो

मुंबई : आजवरच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत, परतीचा पाऊस नीट झाला नाहीतर आणखी गंभीर अवस्था होऊ शकते, असे सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षनेत्यांना केले. त्याचवेळी सरकारवर दबाव आणण्यासाठी जेलभरो आंदोलनाची हाकही दिली.
राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी खा. पवार यांनी गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, खा. प्रफुल पटेल, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी नेते उपस्थित होते.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती या वेळी पवार यांनी विभागनिहाय नेत्यांकडून घेतली. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावित, चारा छावण्या सुरू कराव्यात, परंतु शक्यतो दावणीला चारा देण्याची व्यवस्था करावी आणि दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी, आदी मागण्या सरकारपुढे मांडण्याचे बैठकीत ठरले.
परिस्थिती अत्यंत गंभीर असून, मंत्रीच नाहीतर विरोधकांनादेखील ग्रामीण भागात फिरणे मुश्कील होईल, अशी भीतीही खा. पवार यांनी या वेळी बोलून दाखवली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: NCP's jail for drought victims