मुंबई - राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात अनेक बैठका पार पडल्या होत्या. जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी ३-४ वेळा या बैठका झाल्या. शरद पवारांच्या डोळ्यादेखत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याची अजित पवारांची तीव्र इच्छा होती. त्यातूनच माझ्यासोबत त्यांची बैठक झाली. सुरुवातीच्या २-३ बैठकांमध्ये अजित पवारांनी त्यांच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या. त्यानंतर अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील यांच्यासमावेत शरद पवारांसोबतही बैठक झाली होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बातम्या पुढे येत आहेत. मात्र त्याआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर या नेत्यांनी विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात येणार असून त्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडेल असं सांगण्यात येते. मात्र या घडामोडींबाबत शरद पवारही अनभिज्ञ आहेत. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत कल्पना नसल्याचे पवारांनी सांगितले. परंतु राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सगळे काही ठरले होते. जिल्हा परिषदेनंतर विलीनीकरणाची घोषणाही होणार होती असं शरद पवारांनी म्हटलं.
शरद पवारांच्या या विधानाला दुजोरा देत जयंत पाटील यांनीही बैठकांबाबत खुलासा केला. जयंत पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा अजितदादा स्वत: माझ्या घरी आले होते. माझी त्यांची ४ वेळा चर्चा झाली होती. अनेकदा ते जेवणासाठी यायचे आणि जेवण करत चर्चा करूनच जायचे. अजित पवारांची इच्छा होती, साहेबांच्या देखत त्यांना दोन्ही पक्ष एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जनमाणसात जे आहे ते सगळं पुसून मी साहेबांसोबत पुन्हा एकत्र यायला तयार आहे असं अजितदादा म्हणायचे. विलीनीकरणाबाबत त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एकदा नव्हे तर ८ ते १० वेळा आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या. बैठकीचं ठिकाण माझे घरच होते. पहिल्या दोन-चार बैठकांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जे झाले ते विसरूया, आपण सगळे एक होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवूया ही अजितदादांची अंतिम आणि तीव्र आग्रहाची भूमिका होती असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, काळाची गरज, मजबुरीने का होईना नेता निवडणे हे पक्षाचे आमदार करू शकतात. त्यामुळे आमदारांच्या भावना नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या. त्यामुळे आमदारांच्या बैठका होत आहेत. सध्या विलीनीकरण झाले नाही. विलीनीकरणाबाबत अजितदादांच्या मनात काय असलं असते तर माहिती नाही. परंतु आतापर्यंत त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर कुठे मत मांडले नाही. मात्र त्यांची विलीनीकरणाची इच्छा होती असं त्यांच्या देहबोलीवरून आम्ही अंदाज बांधत होतो असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी केले.
Web Summary : Ajit Pawar desired NCP reunification, holding meetings at Jayant Patil's residence. Post-demise, reunification rumors surface amidst political maneuvers and Sunetra Pawar's potential role. Doubts remain.
Web Summary : अजित पवार राकांपा के पुनर्मिलन की इच्छा रखते थे, जयंत पाटिल के आवास पर बैठकें हुईं। मृत्यु के बाद, राजनीतिक युद्धाभ्यास और सुनेत्रा पवार की संभावित भूमिका के बीच पुनर्मिलन की अफवाहें उठीं। संदेह बरकरार हैं।