महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने; नवाब मलिक यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:14 PM2021-08-30T18:14:22+5:302021-08-30T18:15:03+5:30

ज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, मलिक यांचं वक्तव्य.

ncp leader nawab malik slams bjp government over enforcement directorate on mahavikas aghadi mla | महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने; नवाब मलिक यांचा आरोप 

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने; नवाब मलिक यांचा आरोप 

Next
ठळक मुद्देज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, मलिक यांचं वक्तव्य.

"महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावरुन नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

"ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापे टाकले जात आहेत. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे," असेही नवाब मलिक म्हणाले. "सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते," असेही त्यांनी नमूद केले.

"भाजप जनतेला धोका देतंय" 
"राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपाकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. पुण्यातील कसबा मंदिराच्या समोर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरही नवाब मलिक यांनी टीका केली. कोविडचा धोका आहे, हे जनतेला कळत आहे. मोदी साहेब स्वत: सांगत आहेत तरी हे लोक ऐकत नाहीत. भाजप जनतेला धोका देत आहे. लोकांची दिशाभूल करत आहे," असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

"हिंमत होती म्हणून लढलो"
"भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळेच ज्यांच्यात हिंमत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. भाजप बेजबाबदारपणे कृत्य करत आहे," अशी टीका नवाब मलिक यांनी केली. तसेच, नवाब मलिक यांनी थेट नारायण राणेंना लक्ष्य केले. "आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे, तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रीय मंत्री झालो नाहीत," अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला.

Web Title: ncp leader nawab malik slams bjp government over enforcement directorate on mahavikas aghadi mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.