मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:35 IST2026-04-28T13:34:54+5:302026-04-28T13:35:43+5:30
ही केवळ नामकरणाची बाब नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सन्मान आणि धनगर समाजाच्या अस्मितेचा गौरव ठरेल असं पत्रात म्हटलं आहे.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी
मुंबई - मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा–खंडाळा घाटातील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' यांचे नाव देण्याची मागणी होऊ लागली आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष पटकारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
मुंबई–पुणे महामार्ग हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा द्रुतगती मार्ग मानला जातो. या मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास सुलभ झाला असून उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. येत्या १ मे पासून या मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प लोकांच्या सेवेत आल्यानंतर घाटातील वळणे आणि वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ आणखी घटणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
सह्याद्रीतील कठीण बोरीघाट परिसरात मार्ग दाखवून ब्रिटिशांना मदत करणारे आणि स्वातंत्र्याची मागणी करून हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी शिंगोबा धनगर हे प्रेरणादायी क्रांतिकारक होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या ऐतिहासिक मार्गाला शिंगोबा धनगर यांचे नाव देणे. ही केवळ नामकरणाची बाब नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सन्मान आणि धनगर समाजाच्या अस्मितेचा गौरव ठरेल असं पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध समाजघटकांचे योगदान आहे. अशा दुर्लक्षित पण प्रेरणादायी क्रांतीवीरांच्या नावाने हा मार्ग प्रकल्प ओळखला गेला तर येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळेल. विशेष म्हणजे १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल. या मागणीबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेत १ मे २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग असं नव्या मार्गाने नामकरण करावे अशी मागणी संतोष पटकारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.