मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक, हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:57 IST2025-07-08T12:53:41+5:302025-07-08T12:57:51+5:30
Mumbai Suicide News: मोबाईल चोरीच्या आरोपाखाली सहार पोलिसांनी अटक केलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने लॉकअपमध्येच आत्महत्या केली.

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक, हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या, नेमकं काय घडलं?
मोबाईल चोरीच्या आरोपाखाली सहार पोलिसांनी अटक केलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने लॉकअपमध्येच आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (०७ जुलै २०२५) सकाळी घडली. आरोपीने लॉकअपमधील शौचालयाच्या पाइपला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती सहार पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई क्राइम ब्रांच या प्रकरणात तपास करीत आहे.
अंकित राय, असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईत विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करीत होता. दरम्यान, मित्रांचा मोबाईल चोरी करण्याच्या आरोपाखाली त्याला रविवारी अटक करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असताना अंकितने लॉकअपमधील शौचलायात गमछ्याने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. परंतु, नियमांनुसार तुरुंगात कोणतीही खासगी वस्तू ठेवण्याची परवानगी नसते. अशात त्याला गमछा कसा मिळाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.