इस्त्रायलच्या मदतीनं मोदी सरकारकडून भारतीयांची हेरगिरी; आव्हाडांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:24 PM2019-10-31T14:24:44+5:302019-10-31T14:29:55+5:30

हेरगिरी खपवून घेणार नाही, लढा उभारु; आव्हाडांचा इशारा

Modi government spies Indians with help of Israel alleges ncp leader jitendra Awhad | इस्त्रायलच्या मदतीनं मोदी सरकारकडून भारतीयांची हेरगिरी; आव्हाडांचा गंभीर आरोप

इस्त्रायलच्या मदतीनं मोदी सरकारकडून भारतीयांची हेरगिरी; आव्हाडांचा गंभीर आरोप

Next

ठाणे (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरु केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे पाळत ठेवण्याचे काम इस्रायलच्या एनएसओ समूहाने भारत सरकारच्या परवानगीनेच सुरु केले आहे. त्यामुळे सरकारनेच भारतीयांच्या खासगी जीवनात डोकावण्यास सुरुवात केली आहे. संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकुमशाहीने रचला आहे. ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नाही, त्याविरोधात लढा उभारु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 

भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्या फोनमधले व्हॉट्स अप मेसेज मे 2019 पर्यंत, त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा व्हाट्स अपने इस्रायलच्या एनएसओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यात केला आहे. एनएसओ ही कंपनी पीगेसस नावाचं एक सॉफ्टवेअर बनवते आणि आणि मोबाईल धारकाच्या स्मार्टफोनमध्ये चलाखीने पेरते. 'एक्सप्लॉईट लिंक' या नावाचा पर्याय जर तुम्ही कळत नकळत क्लिक केलात तर पीगेसस तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर व्हाट्स अपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले, तरी तुमचे मेसेज पीगेसस वाचू शकतो, हे या खटल्यामुळे उघडकीस आले आहे. याबाबत आमदार आव्हाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सामान्य माणसे, कार्यकर्ते यांच्यावरील ही हेरगिरी आपण सहन करणार नसल्याचेही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 

आ. आव्हाड यांनी जारी केलेल्या व्हिडीओनुसार, भारतीय इतिहासातील सर्वात वाईट, अपमानजनक आणि जगाच्या राजकीय मंचावर शरमेने मान खाली घालायला लावणारी बातमी आज आली. सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये व्हॉट्स अपने एक गुन्हा दाखल केला आहे. इस्त्रायलच्या यंत्रणांनी पीगेसस नावाचे एक अ‍ॅप वापरुन लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या फोनमध्ये त्यांना न विचारता एक अ‍ॅपची घुसखोरी करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून भारतातील दलित कार्यकर्ते, शहरी आंदोलक, काही राजकारणी, काही पत्रकार यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. हे सर्व इस्त्रायलच्या माध्यमातून, त्यांची यंत्रणा वापरुन करण्यात येत आहे. इस्त्रायल आणि मोदी यांचे संबंध किती घनिष्ठ आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण, भारतीय संविधानाने दिलेले अलिखित स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे काम सरकारचे आहे आणि आता त्याच स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, असे आव्हाड म्हणाले आहे.

 1970-71 मध्ये अमेरिकेत हेन्री किसिंजर आणि अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं वॉटरगेट प्रकरण उघडकीला आल्यानंतर निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. भारतातसुद्धा कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांना फोन टॅपिंग प्रकरणाची जबर किंमत मोजावी लागली होती. त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. तर मग आता नरेंद्र मोदी कोण मोठे लागून गेले की जे बेकायदा, अनैतिक आणि अश्लाघ्य मार्गाने आपल्याच देशाच्या नागरिकांवर अशी हेरगिरी करतील?  मोबाईल बेडरूममध्ये ठेवून तुम्हाला कपडे बदलणंसुद्धा शक्य होणार नाही. भारतीय लोक आपल्या शयनकक्षामध्ये काय करताहेत, यावरदेखील इस्रायलच्या एनएसओ समूहाचे लक्ष असेल; ही माहिती ते भारतीय सरकारलाच देणार आहेत. कारण, सरकारच्या मर्जीनेच ही हेरगिरी सुरु झाली आहे. त्यामुळे  मोबाईलधारकाला काहीही खाजगी आयुष्य शिल्लक राहणार नाही, असेही आमदार आव्हाड यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Modi government spies Indians with help of Israel alleges ncp leader jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.