...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
By सुमेध वाघमार | Updated: April 14, 2026 08:44 IST2026-04-14T08:41:33+5:302026-04-14T08:44:41+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची जाज्वल्य भूमिका आणि संघर्षमय जीवनप्रवास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून नव्या पिढीसमोर जिवंत होत आहे.

...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
- सुमेध वाघमारे
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची जाज्वल्य भूमिका आणि संघर्षमय जीवनप्रवास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून नव्या पिढीसमोर जिवंत होत आहे.
नागपुरातील संशोधक मंगेश दहिवले यांनी साकारलेल्या या अनोख्या प्रयोगातून बाबासाहेब जणू थेट संवाद साधताना दिसतात. विन्स्टन चर्चिल आणि क्लेमेंट ॲटली यांच्यासोबत वंचित समाजाच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी मांडलेली ठाम भूमिका व स्वातंत्र्यपूर्व भारतातील राजकीय वास्तव या सगळ्यांचा प्रभावी संगम या डिजिटल सादरीकरणातून उलगडतो आणि सर्वांनाच अचंबित करतो.
‘मनाचे स्वातंत्र्य’ संकल्पनेवरही व्हिडिओ
एआय व्हिडीओंमध्ये बाबासाहेबांचे प्रसिद्ध ग्रंथ ‘ॲनिहलेशन ऑफ कास्ट’मधील विचार जणू स्वत: बाबासाहेबच मांडत आहेत, असा भास निर्माण होतो.
जातव्यवस्थेवरील त्यांची चिकित्सक समीक्षा, सामाजिक न्यायावरील त्यांचे तत्त्वज्ञान आणि बौद्धिक स्वातंत्र्याची त्यांची भूमिका या माध्यमातून प्रभावीपणे उलगडताना दिसते. त्याचप्रमाणे ‘मनाचे स्वातंत्र्य’ या बाबासाहेबांनी मांडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित एआय व्हिडीओही त्यांनी तयार केला आहे.
‘थ्रीडी-होलोग्राम’मधून बाबासाहेबांचा संवाद
अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून इतिहासातील व्यक्तिमत्त्वांना नव्या स्वरूपात सादर करण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि ‘टॅगबिन’ यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला ‘एआय होलोबॉक्स’ हा उपक्रम त्यापैकी एक महत्त्वाचा प्रयोग मानला जातो. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाबासाहेबांचा त्रिमितीय (थ्रीडी) होलोग्राम तयार करून थेट संवाद साधण्याची संधी दिली जाते.