"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 08:05 IST2026-04-14T07:59:26+5:302026-04-14T08:05:54+5:30

इराणच्या नाकेबंदीवरून अमेरिका-चीन आमनेसामने आले असून ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक महायुद्ध पेटण्याची भीती आहे.

Tensions Rise as China Issues Direct Warning to US Over Strait of Hormuz | "आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती

"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती

China Warn US: मध्य-पूर्वेतील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांना नौदलाद्वारे वेढा घालण्याचे आदेश दिल्यानंतर चीन संतप्त झाला आहे. याप्रकरणी चीनने अमेरिकेला उघड इशारा दिला असून, आमच्या व्यापारात आणि ऊर्जा करारात ढवळाढवळ करू नका, असे ठणकावून सांगितले आहे. होमुर्जवरून सुरू झालेला हा वाद आता अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील थेट संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्हे आहेत.

होर्मुज आमच्यासाठी खुलेच राहणार; चीनचा थेट इशारा

चीनचे संरक्षण मंत्री एडमिरल डोंग जून यांनी अमेरिकेच्या नाकेबंदीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. "चीनचे इराणसोबत ऊर्जा आणि व्यापारी करार आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. होर्मुजवर इराणचे नियंत्रण आहे आणि हा जलमार्ग चीनच्या जहाजांसाठी खुलाच राहील. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणत्याही बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही," असं डोंग जून यांनी म्हटलं.

चीनसाठी हा जलमार्ग महत्त्वाचा का?

चीन आपल्या गरजेच्या ४० टक्के कच्चे तेल याच मार्गावरून मिळवतो. चीनच्या ३० टक्के एलएनजी गरजा याच जलमार्गावर अवलंबून आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

ट्रम्प यांची नाकेबंदी आणि पेट्रोडॉलरचा धोका

पाकिस्तानमध्ये इराणसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्व बंदरांना लक्ष्य करण्याचे आदेश दिले. अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार, इराणमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर कडक नजर ठेवली जाईल. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा खरा निशाणा चीनचे चलन युआन आहे. इराण आणि चीनमधील व्यापार युआनमध्ये होत असल्याने अमेरिकेच्या पेट्रोडॉलरला आव्हान मिळत आहे. ट्रम्प यांना हेच आव्हान मोडून काढायचे आहे.

तेलाच्या किमतीत भडका

अमेरिकेच्या या निर्णयाचा तात्काळ परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. ब्रेंट क्रूड ऑईल १०१.८८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर यूएस क्रूड १०४.६९ डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहे.

इराणची जशास तसे उत्तर देण्याची धमकी

अमेरिकेच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून इराणने पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातातील सर्व बंदरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. यामुळे या भागात पुन्हा एकदा भीषण युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सने हाय-अलर्ट जारी केला असून, या भागात लष्करी हालचाली वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

चीनवर ५० टक्के टॅरिफची टांगती तलवार

ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली की, जर चीनने इराणला हवाई संरक्षण प्रणाली किंवा शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला, तर चीनमधून येणाऱ्या मालावर ५० टक्के टॅरिफ लावला जाईल. दरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे.

Web Title : चीन की अमेरिका को चेतावनी: ईरान से दूर रहें; युद्ध का खतरा मंडराया।

Web Summary : चीन ने अमेरिका को ईरान के साथ व्यापार और ऊर्जा सौदों में हस्तक्षेप न करने की चेतावनी दी है। चीन ने होर्मुज तक अपनी पहुंच खुली रखने पर जोर दिया, जो तेल आयात के लिए महत्वपूर्ण है। तनाव बढ़ने से संघर्ष का खतरा मंडरा रहा है और वैश्विक तेल की कीमतों पर असर पड़ रहा है।

Web Title : China Warns US: Hands off Iran; risk of war looms.

Web Summary : China warns the US against interfering with its Iran trade and energy deals following US naval blockade orders. China emphasizes its access to Hormuz must remain open, crucial for oil imports. Tensions escalate, raising fears of conflict and impacting global oil prices.