अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:04 IST2026-04-14T09:03:44+5:302026-04-14T09:04:11+5:30
Mumbai News: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रवेश पास घोटाळा प्रकरणी विधानभवनातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली होती. चौथा कर्मचारी अद्याप पसार आहे.

अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रवेश पास घोटाळा प्रकरणी विधानभवनातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली होती. चौथा कर्मचारी अद्याप पसार आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये विधानभवनातील लिपिक-टंकलेखक महेश पिराजी दुम्पलवार, मनोज आनंदा मोरबाळे आणि शिपाई स्वप्निल रमश तायडे यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आदेश काढण्यात आले. विधानभवनचा कर्मचारी असलेला चौथा आरोपी लवेश नाकटे पसार आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयातून एमआयडीसीच्या लेटरहेडवर पास देण्यासंबंधीचे विनंती पत्र तयार करण्यात आले आणि त्या आधारे पास दिले जात होते. तथापि असे पत्र आपल्या कार्यालयाने दिलेच नाही असे सामंत यांनी विधान परिषदेत सांगितल्यानंतर सभापती प्रा.राम शिंदे यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या.
सहा जणांना झाली अटक
विधानभवनातील अन्य कर्मचारी, अधिकारी या घोटाळ्यात सामील असल्याची शक्यता आहे. सातपैकी सहा आरोपींना अटक झाली. त्यात निलंबित तिघे आणि सुरक्षा रक्षक नागेश पाटील, गणपत जावळे आणि दत्तात्रय गुंजाळ यांचा समावेश आहे.
अशा प्रकारांना कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी दोषरहित पद्धत लवकरच आणली जाईल. दलालांचा बंदोबस्त करू.
- प्रा. राम शिंदे , सभापती विधान परिषद