चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:58 IST2026-04-14T09:54:04+5:302026-04-14T09:58:23+5:30
Chaitra Pradosh Vrat Masik Shivratri April 2026: चैत्र महिन्यात प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रि व्रत एकाच दिवशी आले आहेत. जाणून घ्या...

चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Chaitra Pradosh Vrat Masik Shivratri April 2026: मराठी नववर्षाचा पहिला चैत्र महिना संपून वैशाख महिना सुरू होणार आहे. चैत्र महिन्याचे अवघे काही दिवस राहिले आहेत. तत्पूर्वी, चैत्र महिन्यात प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्र एकाच दिवशी येण्याचा शुभ योग जुळून आलेला आहे. ही दोन्ही व्रते महादेव शिवशंकरांना समर्पित व्रते आहेत. प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रि व्रतात शिवपूजन कसे कराल? पाहा, सोपा विधी आणि प्रभावी शिवमंत्र...
बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रि आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. प्रदोष व्रत बुधवारी येत असल्यामुळे याला बुध प्रदोष असे म्हटले जात आहे. या दिवशी महादेवांसोबत बुध ग्रहाशी संबंधित उपाय, उपासना करावी, असे सांगितले जाते. कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर बुध प्रदोष व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शिव-पार्वती, गणपती आणि कार्तिकेय पूजन
प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांचे पूजन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. प्रदोष व्रताची पूजा सायंकाळी केली जाते. तिन्हीसांजेला, दिवेलागणीला प्रदोष काळी प्रदोष व्रताचरण आणि पूजन करावे, असे सांगितले जाते. सर्व दोषातून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत आणि भगवान महादेवाची प्रिय तिथी म्हणजे शिवरात्रि एकाच दिवशी येणे सामान्य मानले जात नाही. प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री असा योग वारंवार जुळून येत नाही.
प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रि पूजा विधी
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
- शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजा करणे शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. आपापले कुळधर्म आणि कुळाचार, परंपरा पाळून पूजन करावे.
- बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
- काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख-समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
व्रत पूजनानंतर जप करायचे अत्यंत प्रभावी शिव मंत्र
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।।
शिव नामावली मंत्र
।। श्री शिवाय नम:।।
।। श्री शंकराय नम:।।
।। श्री महेश्वराय नम:।।
।। श्री सांबसदाशिवाय नम:।।
।। श्री रुद्राय नम:।।
।। ॐ पार्वतीपतये नम:।।
।। ॐ नमो नीलकण्ठाय नम:।।
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात्।
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥