इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा ; मग बघा काय होते ते : तृप्ती देसाईंना मनसेचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:58 PM2020-02-19T15:58:33+5:302020-02-19T16:10:41+5:30

तृप्ती देसाई यांना दिली शूर्पनखेची उपमा

MNS's Rupali Patil-Thombre threatens to trupti desai in the case of indorikar maharaj | इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा ; मग बघा काय होते ते : तृप्ती देसाईंना मनसेचे आव्हान

इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा ; मग बघा काय होते ते : तृप्ती देसाईंना मनसेचे आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्देदेसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाईची केली मागणीकिर्तनाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, तरुणांना शिक्षण आदी विषयांवर वेळोवेळी प्रबोधन

पुणे : हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या दिलगिरीनंतरही त्यांना काळे फासण्याचा इशारा दिलेल्या तृप्ती देसाईंसमोर आता मनसेचे आव्हान उभे राहिले आहे. इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा, मग बघा काय होते ते असा सज्जड दमच मनसेच्यामहिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भरला आहे. तृप्ती देसाई या रामायणातील शुर्पनखेसारख्या वागत असून वैचारिक विकृती दाखवित असल्याचे पाटील म्हणाल्या. 
हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी त्यांच्या कीर्तनादरम्यान सम-विषम तिथींचा दाखला देत संततीप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्याचा अंधश्रद्धा निर्मुलन संस्था आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी निषेध केला होता. देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी अहमदनगरला जाऊन पोलीस अधिक्षकांची भेट घेतली होती. आठ दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन तोंडाला काळे फासू असा इशारा दिला आहे. याविषयावरुन वादंग उठल्यानंतर इंदूरीकर महाराजांनी लेखी दिलगिरी व्यक्त केली. मात्र इंदुरीकर महाराजांनी माफी  मागितलेली नसल्याचे सांगत देसाई यांनी काळे फासण्याचा तसेच मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडण्याचा इशारा दिला आहे. 


या गदारोळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देसाई यांचा समाचार घेत त्यांना शुर्पनखेची उपमा दिली. शुर्पनखेची विकृती ठेचण्याकरिता तिचे नाक कापावे लागले होते. तसेच महाराजांना काळे फासण्याचा प्रयत्न जरी केला तरी कोणाचे तोंड काळे होते ते पहा. देसाईंचे अति होत चालले आहे. महाराजांनी केलेल्या सामाजिक प्रबोधनाकडे दुर्लक्ष का केले जातेय. आपल्या किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, कुटुंब पद्धती, तरुणांना शिक्षण व रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर वेळोवेळी प्रबोधन केल्याचे पाटील म्हणाल्या. देसाई यांची संस्था रजिस्टर नसून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल आहेत. हा विनाकारण वाद निर्माण करुन सवंग प्रसिद्धीचा प्रयत्न असल्याचा आरोप पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. 

Web Title: MNS's Rupali Patil-Thombre threatens to trupti desai in the case of indorikar maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.