MNS Support Bacchu Kadu Shetkari Dindi:बच्चू कडू यांचे अभिनंदन करतो. राज ठाकरे यांना सांगितले की, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी दिंडी काढलेली आहे. सातबारा कोरा होण्यासह आणखीही काही त्यांच्या मागण्या आहेत. त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. राज ठाकरे यांनी तत्काळ होणार दिला. राज ठाकरे मला म्हणाले की, केवळ पाठिंबा देऊ नको, तर तू स्वतः त्या ठिकाणी जा. बच्चू कडू यांच्या दिंडीत सहभागी होऊन शेतकऱ्यांना निरोप दे की, त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत. कुठूनही पैसे आणा पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, शेतकरी राजा जे पिकवतो, तेच आम्ही खातो. या दिंडीला, पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की, बच्चू कडू ताठ कण्याचे लढाऊ बाण्याचे व्यक्तिमत्व आहेत. एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा पुढे घेऊन जात असेल, तर त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभे राहायला हवे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजे, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा
सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का? जर तुमच्याकडे पैसे नाहीत. राज्यावर कर्ज जवळपास साडेनऊ कोटींचे होईल. तुमच्याकडे पैसे नाही, तर तुम्ही घोषणा करता कशाला? घोषणा करायला नको. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सरकार तुमचे आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पैसे आणा. राज्याने जीएसटीच्या माध्यमातून ३१ हजार कोटी रुपये दिले. यूपीसारख्या राज्यांनी केवळ ९ हजार कोटी रुपये दिले. केंद्र सरकार पैसे द्यायला नकोत का. तुमच्याकडे पैसे नसेल तर आणा कुठून आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे, तो शेतकरी आणि मजूर आहे. मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही, तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूराने सुखाचा श्वास घेतला पाहिजे. त्याचे मरण थांबले पाहिजे. यवतमाळमध्ये मनसेने दिलेला पाठिंबा दिला. बाळा नांदगावकर इथे आले. त्यांचे निश्चितच आम्ही आभार मानतो. देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे जेव्हासोबत राहतील, तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा मिळेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. सरकारला नमावे लागेल आणि कर्जमाफी करावी लागेल. पैसे नाही म्हणतात तर शक्तिपीठ महामार्गाला वीस हजार कोटी कसे दिले? ते पैसे कुठून आले, तुमच्याकडे कोणी मागितले होते? साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा की, शक्तिपीठ महामार्ग हवा म्हणून केला असेल. लाडकी बहीण योजना आमच्यावर लादली. अर्ध्या बहिणींचे अर्ज तुम्ही रद्द करून टाकले, जी मागणी आहे ते द्यायचे नाही आणि नको ते द्यायचे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.