लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचे मतदान आटोपले असताना आता विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या निवडणूक हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोअर कमिटीने एकास पाच फाॅर्म्युल्याने केंद्रीय भाजपकडे नावे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसने आधीच समर्थन दिलेले असताना खा. सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे यांना गळ घातली आहे. आमदारकीसाठी एक नाव ठरविताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मोठीच कसरत होणार आहे. केंद्रीय भाजपशी चर्चा करून नावे अंतिम करण्याचा अधिकार ‘वर्षा’वरील बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना देण्यात आला.
‘लोकमत’च्या हाती आलेली भाजपची संभाव्य नावांची यादी
डॉ. राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर, माजी आमदार प्रज्ञा सातव, राजा राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, सुरेश हळवणकर, निलय नाईक, प्रकाश पाटील देवसरकर तसेच माजी मंत्री अनंतराव देशमुख. याशिवाय गणेश हाके, नीता केळकर, राजेश पांडे, डॉ. आरती फुसाटे, अतुल काळसेकर, माधव भंडारी, माधवी नाईक, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, सुरेश बनकर, अर्चना पाटील चाकूरकर आणि दयाशंकर तिवारी.
सपकाळ मातोश्रीवर; सुप्रियांची एक्स पोस्ट
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर निवडून जाण्याची शक्यता वाढली आहे. काँग्रेसने आधीच त्यांना पाठिंबा दिलेला होता. राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी, ठाकरे यांनीच विधान परिषद लढावी, ही आमच्या पक्षाची आग्रहाची विनंती आहे.
ते राज्यातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्याचा फायदा राज्याला आणि सभागृहाला नेहमीच होत राहील, असा आमचा विश्वास आहे. मविआने त्यांच्या नावाचा सकारात्मक विचार करावा, असे एक्स पोस्टवर म्हटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
अजित पवार गटाकडे जागा एक, इच्छुक मात्र अनेक
- आमदारकीचा एक उमेदवार ठरविताना इच्छुकांच्या गर्दीमुळे अजित पवार गटाच्या अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पक्षातील प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. ‘दादानिष्ठ’ उमेदवारच द्यावा, असा पक्षात सूर आहे. या एका जागेसाठी प्रयत्न करत असलेल्यांमध्ये राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील, विक्रम संजय काकडे यांचा समावेश आहे.
- माजी आमदार राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक आहेत. तर अनिकेत तटकरे हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव आधीही विधान परिषदेवर होते. पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी वादग्रस्त ठरलेले आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुनील टिंगरेही या जागेसाठी प्रयत्नशील आहेत.
संधी मिळतेच असे नाही
भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीने जी नावे दिल्लीला पाठविली त्यापेक्षा वेगळेच नाव दिल्लीहून दिले जाऊ शकते, असा अनुभव आहे. त्यामुळे कोअर कमिटीने दिलेल्या नावांमधूनच सहा नावे येतील याची शाश्वती नाही. मात्र, सहापैकी तीन नावे ही प्रदेशाने सुचविलेल्यांतून असू शकतील.
Web Summary : Maharashtra's legislative council elections gain momentum. BJP forwards names; Congress supports Thackeray's candidacy. NCP also urges Thackeray to contest. Ajit Pawar faction faces difficulty finalizing candidate amid multiple aspirants. Core committee's recommendations may not guarantee selection.
Web Summary : महाराष्ट्र विधान परिषद चुनाव तेज हो गया है। बीजेपी ने नाम भेजे; कांग्रेस ने ठाकरे की उम्मीदवारी का समर्थन किया। एनसीपी ने भी ठाकरे से चुनाव लड़ने का आग्रह किया। कई दावेदारों के बीच उम्मीदवार तय करने में अजित पवार गुट को मुश्किल हो रही है। कोर कमेटी की सिफारिशें चयन की गारंटी नहीं दे सकती हैं।