वॅगनमधून लाखो रुपयांच्या कोळशाची चोरी

By Admin | Updated: June 23, 2014 01:11 IST2014-06-23T01:11:25+5:302014-06-23T01:11:25+5:30

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जिल्ह्यातील कोळसा खाणीतून रेल्वेगाडीच्या माध्यमातून कोळसा आणला जातो. मात्र या गाडीतून कोळशाची खुलेआम चोरी केली जात असल्याची माहिती आहे.

Millions of dollars worth of steal from wagon | वॅगनमधून लाखो रुपयांच्या कोळशाची चोरी

वॅगनमधून लाखो रुपयांच्या कोळशाची चोरी

संबंधितांचा कानाडोळा : धावत्या रेल्वेतूृन फेकला जातो कोळसा
चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जिल्ह्यातील कोळसा खाणीतून रेल्वेगाडीच्या माध्यमातून कोळसा आणला जातो. मात्र या गाडीतून कोळशाची खुलेआम चोरी केली जात असल्याची माहिती आहे.दररोज लाखोंचा कोळसा चोरला जात असतानाही वीज केंद्राचे अधिकारी व पोलीस विभाग यापासून अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाऔष्णिक वीज केंद्राला घुग्घुस, माजरी कोळसा खाणीतून रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून कोळसा पुरविला जातो. या रेल्वेगाड्या काही ठिकाणी थांबतात. त्यावेळी रेल्वेमध्ये २० ते २५ युवकांचे टोळके चढतात. धावत्या रेल्वेमधूनच कोळसा खाली फेकला जातो.ज्या ठिकाणी रेल्वेची गती मंदावते, तिथून हे टोळके पटापट खाली उड्या मारतात. खाली फेकलेला कोळसा मग जमा करून त्याची काळ्याबाजारात विक्री केली जाते. मागील वर्षभरापासून हा गोरखधंदा नित्यनेमाने सुरू असतानाही याकडे अद्याप कुणाचे लक्ष जाऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चंद्रपूर वीज केंद्रात निकृष्ट कोळसा हा नेहमीचाच वादाचा विषय राहिला आहे. यामुळे दरवर्षी वीज केंद्राला कोट्यवधींचा फटका बसतो.
तसेच ट्रकद्वारे पुरविण्यात येणाऱ्या कोळशामध्येही नेहमीच हेराफेरी केली जात असल्याचे अनेक प्रकार यापूर्वीच उघडकीस आले आहेत.
काही महिन्यांपूर्वी कोळसा चोरीसंदर्भात वीज केंद्र प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने चोरट्यांनी हा नवा मार्ग शोधून काढल्याची माहिती आहे. भरदिवसा रेल्वेगाड्यातून कोळसा काढला जातो. रात्रीही हा प्रकार सुरूच असतो. घुग्घुस येथून व्हॅगनमध्ये कोळसा भरून तो रात्री तीन फेऱ्यांमध्ये वीज केंद्रापर्यंत आणला जातो. वाटेत कोळसा भरून येणारी रेल्वेगाडी घुग्घुस रेल्वे साईट, ताडाळी पुलाजवळ आणि महेशनगर तुकूम या ठिकाणी थांबते. या ठिकाणाहून कोळसा चोरटे व्हॅगनमध्ये चढतात व कोळशाची लूट केली जाते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Millions of dollars worth of steal from wagon