मेट्रो हाऊसफुल !

By Admin | Updated: June 9, 2014 02:29 IST2014-06-09T02:29:15+5:302014-06-09T02:29:15+5:30

वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत, गगनचुंबी इमारतींना मागे टाकत रविवारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावली आणि लाखो मुंबईकरांनी जल्लोष केला

Metro House! | मेट्रो हाऊसफुल !

मेट्रो हाऊसफुल !

मुंबई : वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत, गगनचुंबी इमारतींना मागे टाकत रविवारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावली आणि लाखो मुंबईकरांनी जल्लोष केला... सलामीलाच सुमारे दोन लाख प्रवाशांनी मेट्रोचा आनंद लुटला. रविवारच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या मेगाब्लॉकला कंटाळलेल्या प्रवाशांनी सुट्टीचा मुहूर्त साधत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने केलेल्या या कूल प्रवासाने मेट्रो रेल्वे अक्षरश: दणाणून गेली.
मेट्रो राणीला आज खास फुलांनी सजविण्यात आले होते. वर्सोवा स्थानकावरही फुलांचा साज चढविण्यात आला होता. वर्सोवा स्थानकावर एमएमओपीएलसह एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. तर स्थानकावर प्रवेश देण्यात आला नसल्याने स्थानकाखाली मुंबईकर प्रवाशांचा मेट्रोच्या स्वागतासाठी जनसागर उसळला होता. मुंबईत पहिल्यांदा धावणाऱ्या मेट्रोचा साक्षीदार होण्यासाठी मुंबईकर हौसेने उपस्थित होते. रविवारच्या भल्या पहाटेच येथील गर्दीला महापूर आला होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीगणेशाची पूजा केली आणि १० वाजून २० मिनिटांच्या सुमारास मेट्रो पायलटच्या केबिनमध्ये प्रवेश करीत हिरवा झेंडा फडकाविला.
या वेळी त्यांच्यासोबत अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानीही उपस्थित होत्या. मेट्रोचे पहिले पाऊल पडताच उपस्थितांनी मोरयाचा गजर केला. पुढच्या काही क्षणांतच मेट्रो रेल्वे घाटकोपरच्या दिशेने रवाना झाली. विशेष म्हणजे घाटकोपरकडे रवाना झालेल्या मेट्रोचे स्वागत करण्यासाठी येथेही प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. घाटकोपर स्थानकावर दाखल होणाऱ्या मेट्रोला पाहण्यासाठी मार्गाखाली उपस्थितांच्या माना उंचावत असल्याचे चित्र होते.

Web Title: Metro House!