Maratha Morcha :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील तीन दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना मुंबईत का यावे लागले याबाबत एकनाथ शिंदे यांनाच विचारा असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले होते. या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी तुम्ही फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत करता? अशा चर्चा आहेत. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही. जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केले होत २०१९, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते दुरुस्त करण्याचे काम आम्ही केल्याचे शिंदे म्हणाले.
"२०२२ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं. देवेंद्रजी आणि आम्ही सर्वजण ताकदीने सर्व प्रसंगांना तोडं देऊ. सरकार म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ . विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकार योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहे. आत एक बाहेर एक भूमिका नको, आम्ही स्पष्ट भूमिका घेतो , असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर
सातारा येथे पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंबाबत प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती. १० टक्के आरक्षण आम्ही दिले. खरेतर आरक्षण कुणामुळे गेले त्यांना राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील आरक्षण हायकोर्टात आम्ही टिकवले, परंतु सुप्रीम कोर्टात आरक्षण का टिकवू शकला नाही, हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला विचारायला पाहिजे होता असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
तसेच मी हे बोलतोय, ते काही लोकांना माहिती पडावे म्हणून बोलतोय. १० टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला दिले. न्या.शिंदे समिती स्थापन करून अनेक पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या गेल्या. १९६७ पूर्वीच्या अनेक नोंदी शोधल्या. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले. त्याचाही लाभ मराठा समाज घेत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.