महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:38 IST2019-10-24T17:33:39+5:302019-10-24T17:38:25+5:30

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपाचे प्रत्येकी तीन मंत्री पराभूत

Maharashtra Vidhan Sabha Result six ministers of bjp shiv sena lost election | महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार

महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दुहेरी धक्का बसला आहे. अब की बार 200 पारची घोषणा देणारी महायुती सध्या 160 जागा जिंकताना दिसत आहे. त्यातच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या सहा सहकाऱ्यांचा पराभव झाला आहे. 

कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जलसंवर्धन मंत्री असलेल्या शिंदेंना राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी धक्का दिला. रोहित पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना परळीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनी पंकजा यांना जवळपास 20 हजार मतांनी पराभूत केलं. मुंडे बंधू भगिनींमधल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपा नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांचादेखील पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी भेगडेंना धक्का दिला आहे. 

भाजपासोबतचे शिवसेनेच्या मंत्र्यांनादेखील मतदारांनी घरचा नारळ दाखवला आहे. शिवसेना नेते विजय शिवतारेंना पुरंदरमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला. जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांना पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी त्यांचा पराभव केला आहे. तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचं हॅट्ट्रिक स्वप्न उद्ध्वस्त झालं. काँग्रेसच्या चंद्रकात जाधव यांनी क्षीरसागर यांना धूळ चारली. 
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result six ministers of bjp shiv sena lost election