Maharashtra Vidhan Sabha Result sanjay raut attacks bjp says next cm will be from shiv sena | महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत; मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'
महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत; मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'

मुंबई: महायुतीमध्ये सत्ता वाटपावरुन संघर्ष सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवतीर्थावर शपथविधी संपन्न होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपासोबतच्या चर्चेच शिवसेनेकडून कोणतीही अडचण नाही. खोटं बोलणारी, टोपी फिरवणारी मंडळीच चर्चेतला प्रमुख अडथळा आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजापवर तिखट शब्दांत हल्ला चढवला. 

उद्धव अंतिम निर्णयापर्यंत आले असून आमचं गणित जमल्यावर ते माध्यमांसमोर मांडू, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, या वाक्याचा पुनरुच्चार केला. बाळासाहेब ठाकरे असताना भाजपाचे नेते मातोश्रीवर यायचे. बाळासाहेब आणि गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यात उत्तम संवाद होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही. मात्र या परिस्थितीला आम्ही जबाबदार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचे बाण सोडले. 

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. त्यावेळी सत्तापदांच्या समान वाटपांचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यामुळे शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा चर्चा व्हायला हवी. हरयाणासारख्या लहान राज्यातल्या सत्ता स्थापनेचा प्रश्न शहा दोन दिवसात सोडवतात. मात्र महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा 9 दिवसानंतरही कायम असल्याचं राऊत यांनी म्हटलं. अमित शहांशी आमचे मधुर संबंध असून ते अतिशय रोखठोक स्वभावाचे नेते आहेत. त्यांना परिस्थितीचं उत्तम आकलन असल्याचे कौतुकोद्गारदेखील राऊत यांनी काढले.

भाजपाकडून शिवसेनेला नवा प्रस्ताव देण्यात आला आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना विचारला. त्यावर शिवसेना बाजारात बसली आहे का? भाजपासोबत केवळ मुख्यमंत्रिपदावर चर्चा होईल, असं उत्तर राऊत यांनी दिलं. गेल्या काही दिवसांत भाजपानं सत्ता स्थापनेसाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. सरकार स्थापनेसाठी गुंडगिरीच्या मार्गाचादेखील वापर करून पाहिला गेला. इतकं घाणेरडं राजकारण गुंडाच्या टोळ्यासुद्धा करणार नाहीत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपावर तोफ डागली. सत्ता गेल्यावर आसपासची माकडं आणि कुत्रीदेखील सोबत राहत नाहीत, अशी जहरी टीकादेखील त्यांनी केली.
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result sanjay raut attacks bjp says next cm will be from shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.