Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 05:08 AM2019-09-22T05:08:47+5:302019-09-22T06:28:17+5:30

पुन्हा फडणवीस सरकार की, सत्तांतर होणार?; आघाडीचं ठरलं, युतीचं घोडं का अडलं?; मनसेच्या ‘राजगडा’ला केव्हा जाग येणार?

Maharashtra Vidhan Sabha 2019 voting on October 21 counting on October 24 | Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

Next

नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे; तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारराजाने दिलेला कौल धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येलाच निकालाच्या स्वरूपात जाहीर होईल आणि ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नवे सरकार सत्तारूढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल. राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पुन्हा संधी देणार की, २०१४ प्रमाणे राज्यात सत्तांतर घडवून आणणार, याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागून आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसह देशातील ६४ विधानसभा आणि बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी नवी दिल्ली येथे जाहीर केला. त्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लांबणीवर टाकली. महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार असून, त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रे असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणात
या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अशोक चव्हाण (भोकर) आणि पृथ्वीराज चव्हाण (कºहाड) हे तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणार उतरणार असून, या मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

वंचित फॅक्टर चालणार का?
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत सात ते आठ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग रोखला होता. मात्र, त्या वेळी एमआयएमसोबत त्यांची युती होती. आता ही युती संपुष्टात आल्याने विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर किती चालणार, याविषयी उत्सुकता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करणार?
लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता प्रचारसभा घेऊन मोदी सरकारवर तोफा डागलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख विधानसभा निवडणूक लढविणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मनसे शंभर जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र या १०० जागा कोणत्या, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
२७ सप्टेंबर (शुक्रवार)- उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
४ ऑक्टोबर (शुक्रवार)- अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
५ ऑक्टोबर (शनिवार)- अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर (सोमवार)- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
१९ ऑक्टोबर (शनिवार)- प्रचाराचा शेवटचा दिवस
२१ ऑक्टोबर (सोमवार)- मतदान
२४ ऑक्टोबर (गुरुवार)- निकाल

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 voting on October 21 counting on October 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.