Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 09:14 IST2025-09-27T09:11:53+5:302025-09-27T09:14:40+5:30
Maharashtra Rain Alert IMD: महाराष्ट्रात शनिवारी पहाटेपासून अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन-तीन दिवस काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
Mumbai Maharashtra Rain Alert: परतीला निघालेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची कोसळधार सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणखी जोर वाढला आहे. पुढील दोन-तीन दिवसात राज्याच्या काही भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी पहाटेपासूनच राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली.
पुढील २४ तासांत ११ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस पडणार
हवामान विभागाने शनिवारी (२७ सप्टेंबर) मराठावाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
28 सप्टेंबर: मुंबईसह १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, रायगड, पुण्याला रेड अलर्ट
राज्यातील अनेक जिल्ह्यात रविवारच्या सुट्टीवर पाणी फेरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दोन-तीन जिल्हे वगळता उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
२८ सप्टेंबर रोजी संपूर्ण रायगड जिल्हा, तर पुणे जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार असल्याचे इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी (२९ सप्टेंबर) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.