Top Marathi News US-Israel Iran War Live: उन्हाच्या तडाख्यानंतर आता पावसाचे सावट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:52 IST2026-03-16T08:46:36+5:302026-03-16T17:52:33+5:30

Live: निवडणूक आयोगाने रविवारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणुकांचा ...

Maharashtra Marathi News Live Updates 16 March 2026: US Israel Iran War, West Bengal, Kerala Assembly Elections, Baramati and Rahuri bypoll, Maharashtra Vidhan sabha Adhiveshan, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL news | Top Marathi News US-Israel Iran War Live: उन्हाच्या तडाख्यानंतर आता पावसाचे सावट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Top Marathi News US-Israel Iran War Live: उन्हाच्या तडाख्यानंतर आता पावसाचे सावट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Live: निवडणूक आयोगाने रविवारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच राहुरी आणि बारामती पोटनिवडणूकही जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग येत आहे. यातच अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध अद्यापही सुरूच आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. हल्ले सुरूच आहेत. याचा मोठा फटका भारतालाही बसत आहे. सिलिंडर मिळण्यासाठी नागरिक अजूनही वणवण करत असून, अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पाहुया, महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... 

LIVE

Get Latest Updates

16 Mar, 26 : 08:21 PM

जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी केली. अखेरीस आव्हाड यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.

16 Mar, 26 : 06:38 PM

हरयाणामध्ये राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी थांबवली, मतांवरील आक्षेपांमुळे मतमोजणी थांबली

हरयाणामध्ये राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी थांबवली, मतांवरील आक्षेपांमुळे मतमोजणी थांबली

16 Mar, 26 : 05:53 PM

गॅस टंचाई कुठेही नाही तर लोक रस्त्यावर का दिसत आहेत? उद्धव ठाकरेंचा सवाल 

"गॅस टंचाई कुठेही नाही तर लोक रस्त्यावर का दिसत आहेत. यामुळे मुंबईतील ४० टक्के रेस्टॉरंट बंद आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळत आहे आणि ते जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही तर त्यांच्या यंत्रणेत काही घोळ आहे. जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीत असं मानणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले असतील तर राज्याचे कठीण आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

16 Mar, 26 : 05:28 PM

VIDEO: हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून 'शिवालिक' एलपीजी टँकर मुंद्रा पोर्टवर दाखल

16 Mar, 26 : 05:26 PM

मोबाईलवरून LPG साठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

16 Mar, 26 : 05:07 PM

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीची शक्यता

तापमानात घट होऊन पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आजपासून (दि.१६) २० मार्चपर्यंत राज्यामध्ये कोकण वगळताउर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.  येत्या दोन दिवसांवर गुढी पाडवाला आला आहे. गुढी पाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल होऊन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे

16 Mar, 26 : 04:34 PM

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ४७ उमेदवारांची यादी प्रसिद्ध

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ४७ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर नेमोम मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत.  

16 Mar, 26 : 04:14 PM

नांदेड : महानगरपालिकेतर्फे अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणार- महापौर कविता मुळे

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका ची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेमध्ये विविध महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा नांदेड शहरात भव्य पुतळा उभारण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला.

16 Mar, 26 : 03:07 PM

अटल बोगद्यामध्ये अडकले हजारो पर्यटक; बर्फवृष्टीचा तडाखा

मनाली येथील अटल बोगद्यामध्ये अचानक बर्फवृष्टी सुरू झाल्याने हजारो पर्यटक अडकले आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांच्या अडचणीही वाढल्या आहेत. अटल बोगद्याबरोबरच साऊथ पोर्टलजवळही जवळपास हजार वाहने ठप्प झाली आहेत. त्यांना सुरक्षितपणे काढण्यासाठी आता प्रशासन आणि पोलीस पथकांनी रात्रीपासूनच मदत मोहीम सुरू केली आहे. 

16 Mar, 26 : 02:53 PM

उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने ही भेट घेतली जात असल्याचे म्हटलं जात आहे.

16 Mar, 26 : 02:45 PM

जालना : एलपीजी रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी मोजावे लागत आहेत जास्त पैसे

जालना शहरात एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच गॅस भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने शेकडो रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत. याबाबत सरकार आणि प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

16 Mar, 26 : 02:15 PM

सत्ताधारी आमदारांना १६०० कोटी देणं ही गद्दारीची किंमत- अनिल परब

अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या थकीत निधीचा मुद्दा उपस्थित करताना सरकारला धारेवर धरले. "राज्य शासन मुंबई महापालिकेला पैसे देणे लागते. दुसरीकडे गेल्या तीन वर्षांत सत्ताधारी आमदारांना १६०० कोटी रुपये देण्यात आले. १६०० कोटी हे हिम्मत की किमत नाही तर गद्दारीची किंमत आहे. हे बक्षीस आहे आणि पूर्वी गद्दारी केल्यावर निजाम हेच करायचे. एका बाजूला राज्य सरकार अशा प्रकारे पैसा खर्च करतं आणि दुसरीकडे महापालिकेला द्यायला पैसे नाहीत. मुंबई महापालिकेत आणि आपल्यामध्ये भांडण असेल तर ते सोडवून किती दिवसात पैसे महापालिकेला देणार आहात," असा सवाल अनिल परब यांनी केला.
 

16 Mar, 26 : 01:49 PM

LPG टंचाईच्या मुद्द्यावरून खर्गेंची सरकारवर टीका; नड्डा म्हणाले- हे संकट भारतामुळे निर्माण झालेले नाही.

भारतातील LPG तुडवड्याच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, विरोधकांनी केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करत या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना मध्येच थांबवत सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

16 Mar, 26 : 01:17 PM

अमरावती : एमडी ड्रग्ससह दोन आरोपी अटकेत; ७६ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

अमरावतीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एमडी अंमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबईहून बडनेरात अंमली पदार्थ विक्रीसाठी येणाऱ्या आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले असून या प्रकरणातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

16 Mar, 26 : 12:51 PM

अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी

उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने अनोळखी क्रमांकावरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा फोन करून "कापून टाकू, ठोकून टाकू" अशी धमकी दिल्यानंतर, दानवे यांनी आज सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

16 Mar, 26 : 12:51 PM

सांगली : वन विभागाच्या धोरणाविरोधात मणदूर बंदची हाक

गेल्या सात दिवसांपासून डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची वन विभागाने दखल न घेतल्याने मणदूर ग्रामस्थांनी आता आरपारच्या लढाईचा पवित्रा घेतला आहे. या निषेधार्थ आज सोमवारी मणदूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

16 Mar, 26 : 12:41 PM

राज्यसभेच्या ११ जागांसाठी मतदान सुरू, तीन राज्यात विरोधक-सत्ताधारी आमनेसामने

राज्यसभेच्या ११ जागांसाठी तीन राज्यांमध्ये मतदान सुरू झाले असून, दुपारपर्यंत अनेक आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बिहारमधील ५, ओडिशातील ४ आणि हरयाणातील २ जागांसाठी मतदान होत आहे. 

या निवडणुकीचे निकाल आजच (१६ मार्च) सायंकाळी जाहीर केले जाणार आहे. राज्यसभेच्या एकूण ३७ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यापैकी २६ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. 

महाराष्ट्रातील सर्वच ७ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. इतर राज्यातही काही जागांवर बिनविरोधी निवडणूक झाली असून, उर्वरित ११ जागांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

16 Mar, 26 : 12:05 PM

ट्रम्पना झटका, मलेशियानं ट्रेड डील तोडली

मलेशियानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना आरसा दाखवला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेसोबतचा आपला व्यापार करार आता मान्य नसल्याचं मलेशियानं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा 'रेसिप्रोकल टॅरिफ' रद्द केला होता. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी ज्या देशांनी अमेरिकेसोबत करार केले होते, त्या जगातील अनेक देशांना मलेशियानं हा व्यापार करार मोडण्याची घोषणा करून एक मार्ग दाखवून दिलाय. 

16 Mar, 26 : 11:49 AM

सांगली: कुरळपमध्ये बिबट्याची दहशत! हल्ल्यात दोन शेळ्या ठार

वाळवा तालुक्यातील कुरळप येथील गावंधरी मळ्यामध्ये बिबट्याने सोमवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घातला. या हल्ल्यात शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या दोन लहान शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी एक शेळी गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

16 Mar, 26 : 11:24 AM

गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवली अन् निवृत्त महिलेला घातला २१ लाखांचा गंडा

देशात गॅस सिलिंडर पुरवठ्याबाबत सुरू असलेल्या अफवांचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता आपला मोर्चा ज्येष्ठ नागरिकांकडे वळवला आहे. ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये एका ६१ वर्षीय वृद्ध महिलेला गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवून तब्बल २१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका बनावट लिंकच्या आधारे या ठकांनी ११ वेळा व्यवहार करून महिलेचे बँक खाते रिकामे केले.

वाचा सविस्तर बातमी

16 Mar, 26 : 10:52 AM

'इराणला चर्चा करायची इच्छा', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू असतानाच एक दावा केला आहे की, 'इराणला चर्चा करायची इच्छा आहे. इराण तडजोड करण्यासाठी उतावळा झाला आहे. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत. पण, मला वाटतं नाही की, ते आताच तयार होतील. आम्ही तोडग्याच्या खूप जवळ पोहोचलो आहेत.'

16 Mar, 26 : 10:37 AM

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून

छत्रपती संभाजीनगर येथे आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी खून करून हा प्रकार लपवण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

16 Mar, 26 : 10:31 AM

पनवेल : गॅस सिलेंडरच्या विक्री केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी करू नका;पालिका प्रशासनाचे आवाहन

पनवेल येथे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असल्याचे समोर आले आहे. मात्र पनवेल पालिका क्षेत्रात गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरून गॅस एजन्सींवर गर्दी करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

16 Mar, 26 : 10:30 AM

सांगली : वन विभागाच्या धोरणाविरोधात आज मणदूर बंदची हाक

गेल्या सात दिवसांपासून डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची वन विभागाने दखल न घेतल्याने मणदूर ग्रामस्थांनी आज आरपारच्या लढाईचा पवित्रा घेतला आहे. या निषेधार्थ आज सोमवारी मणदूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल वगळता सर्व दुकाने, शाळा व हायस्कूलही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

16 Mar, 26 : 10:28 AM

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

जागतिक आणि देशांतर्गत कमोडिटी बाजारात १६ मार्च २०२६ रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतही थोडी घट झाली, तरीही सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी परतताना दिसत नाहीये. 

 

16 Mar, 26 : 09:50 AM

शेअर बाजाराची किरकोळ तेजीसह सुरुवात, निफ्टीही वधारला

शेअर बाजारात आज देशांतर्गत फंडांच्या सततच्या खरेदीमुळे काही सकारात्मक संकेत दिसत आहेत, परंतु आजची सुरुवात मात्र थोडी सुस्त झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसह उघडले, पण नंतर त्यात चढ-उतार दिसून आले. दरम्यान सकाळी ९:३१ वाजता सेन्सेक्स ९७ अंकांच्या वाढीसह ७४,६६१ वर व्यवहार करत होता.

16 Mar, 26 : 09:40 AM

ओडिशात निसर्गाचा कोप! भीषण चक्रीवादळाचा तडाखा

ओडिशात रविवारी निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. मयूरभंज जिल्ह्यात आलेल्या भीषण वादळ आणि चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत दोन जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, क्षणात २०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, अनेक गावे अंधारात बुडाली आहेत.

16 Mar, 26 : 09:33 AM

आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू 

ओडिशातील कटकमध्ये असलेल्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारी पहाटे आग लागली. मेडिसीन इमारतीत असलेल्या ट्रॉमा केअर आयसीयू विभागात झालेल्या दुर्घटनेत १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. 

पहाटे तीन वाजता आग लागली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दल आणि बचाव पथकांना बोलावण्यात आले. अनेक रुग्णांना तातडीने बाहेर काढून दुसऱ्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. पण, यात १० रुग्णांचा बाहेर काढण्याआधीच जीव गेला. 

16 Mar, 26 : 09:31 AM

ट्रम्प यांचा 'नाटो'ला अल्टिमेटम! होर्मुजच्या समुद्रात युद्धनौका पाठवा, नाहीतर...

इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाले असून त्यांनी मित्रराष्ट्रांना उघडपणे लष्करी हस्तक्षेपाचे आवाहन केले आहे. "आम्ही इराणची लष्करी शक्ती खिळखिळी केली आहे, आता इतर देशांनी आपली युद्धनौका पाठवून सहकार्य करावे, अन्यथा 'नाटो'चे भविष्य धोक्यात येईल," असा खळबळजनक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

वाचा सविस्तर बातमी 

16 Mar, 26 : 09:29 AM

बिनविरोध झाल्या नाही, तर लढायला तयार -मुख्यमंत्री फडणवीस

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 

बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊ आणि एकमताने निर्णय करू. पण, आमच्यावर निवडणूक लादली, तर आण्ही लढवायला तयार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 16 March 2026: US Israel Iran War, West Bengal, Kerala Assembly Elections, Baramati and Rahuri bypoll, Maharashtra Vidhan sabha Adhiveshan, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL news