ट्रम्प यांचा 'नाटो'ला इशारा! होर्मुजच्या सामुद्रधुनीसाठी ७ देशांशी चर्चा; मदतीला न येणाऱ्यांना अद्दल घडवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:06 IST2026-03-16T09:05:53+5:302026-03-16T09:06:13+5:30
इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.

ट्रम्प यांचा 'नाटो'ला इशारा! होर्मुजच्या सामुद्रधुनीसाठी ७ देशांशी चर्चा; मदतीला न येणाऱ्यांना अद्दल घडवणार?
वॉशिंग्टन: इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाले असून त्यांनी मित्रराष्ट्रांना उघडपणे लष्करी हस्तक्षेपाचे आवाहन केले आहे. "आम्ही इराणची लष्करी शक्ती खिळखिळी केली आहे, आता इतर देशांनी आपली युद्धनौका पाठवून सहकार्य करावे, अन्यथा 'नाटो'चे भविष्य धोक्यात येईल," असा खळबळजनक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
तेल आणि वायूचे दर गगनाला
इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला होर्मुजचा जलमार्ग रोखल्याने जगभरात तेल आणि गॅसच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. अमेरिकेला या मार्गावरून केवळ १ टक्के तेल मिळते, मात्र चीनसारख्या देशांची ९० टक्के गरज याच मार्गावर अवलंबून आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने वर्षानुवर्षे या मार्गाचे रक्षण केले आहे, पण आता ज्यांना या तेलाची अधिक गरज आहे, त्यांनी संरक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे.
मित्रराष्ट्रांची धरसोड आणि ट्रम्प यांचा संताप
ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनसह ७ देशांकडे युद्धनौका तैनात करण्याची मागणी केली आहे. विशेषतः ब्रिटनवर निशाणा साधताना ट्रम्प म्हणाले, "दोन आठवड्यांपूर्वी ब्रिटन आपली विमानवाहू जहाजे पाठवण्यास कचरत होते. पण जेव्हा अमेरिकेने शत्रूचा खात्मा करून विजय मिळवला, तेव्हा ते मदत करायला तयार झाले. संकटकाळात कोणी मदत केली आणि कोणी पाठ फिरवली, हे अमेरिका लक्षात ठेवेल." दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या मोहिमेत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
इराणची ताकद संपवल्याचा दावा
"इराणकडे आता ना ड्रोन उरले आहेत ना क्षेपणास्त्रे," असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेने इराणच्या 'खर्ग' बेटावरील मुख्य तेल डेपोवर आणि ड्रोन निर्मिती केंद्रांवर हल्ले करून त्यांची कंबर मोडली आहे. इराण आता चर्चेसाठी उत्सुक आहे, पण सध्या आम्ही त्या मनस्थितीत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
'नाटो'ला शेवटचा इशारा?
युक्रेन आणि इतर नाटो देशांना अमेरिका ज्या प्रकारे मदत करते, तशीच मदत आता होर्मुज सुरक्षित ठेवण्यासाठी अपेक्षीत आहे. जर सदस्य देशांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले, तर नाटो संघटनेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. आखाती देशांनीही (सौदी अरब, युएई) सध्या बचावात्मक पवित्रा घेतल्याने अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे.