Maharashtra Government: 'आता शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही' - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 17:13 IST2019-11-28T17:08:11+5:302019-11-28T17:13:15+5:30
Maharashtra Government News: पाच वर्ष शिक्षणाचा विनोद झाला, आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही,

Maharashtra Government: 'आता शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही' - जयंत पाटील
मुंबईः पाच वर्ष शिक्षणाचा विनोद झाला, आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही, शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देणार असल्याचं राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. ते महाराष्ट्र विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आधी शपथ घेऊ द्या, मग सर्व आश्वासनं पूर्ण करू, आम्ही किमान समान कार्यक्रम घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत, शपथ घ्यायला तुमची परवानगी द्या, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. महाराष्ट्रात 80 टक्के स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यासाठी कायदा करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. कारण किमान समान कार्यक्रमामध्ये शेतक-यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलंय. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही भरीव मदत देण्याचा निर्णय या कार्यक्रमातून जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील 10 रुपयांची थाळी आणि 1 रुपयात क्लिनिक हेही आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तात्काळ मदत आणि पिकविमा या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, यासाठीही या कार्यक्रमात घोषणा करण्यात आलीय.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चेसरकार स्थापन करत आहेत. त्याअंतर्गत 'महाराष्ट्र विकास आघाडी'ने आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम काय आहे, याची माहिती दिली.