maharashtra election 2019: Congress, NCP lost 23 seats because of Vanchit Bahujan Aghadi, MIM; BJP Shivsena will not in power | महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते
महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र लढत होते. या दोन्ही पक्षांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. जवळपास 11 जागा वंचितमुळे गमवाव्या लागल्या होत्या. मात्र, विधानसभेलाही या दोन पक्षांचा फटका आघाडीला बसला आहे. या जागा एवढ्या आहेत की, भाजपा-शिवसेना युतीला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण बनणार होते. 


लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीची दलित, वंचित समाज आणि मुस्लिम अशी परंपरागत मते या पक्षांना जाणार होती. लोकसभेला याचा फटका बसला. विधानसभेला मात्र वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी तुटली. लोकसभेला या आघाडीचा एकमेव खासदार निवडून आला होता. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळपास 11 जागा पडण्याएवढी मते या आघाडीने मिळविली होती. 


विधानसभेला आंबेडकर यांनी 288 पैकी 280 जागा मागितल्या आणि एमआयएमला 8 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने एमआयएमच्या खासदाराने आघाडी तुटल्याची घोषणा केली होती. यावर आंबेडकर यांनी ओवेसी यांचा निर्णय अंतिम असल्याचे म्हटले होते. मात्र, ओवेसींनीही यावर शिक्कामोर्तब केले होते. हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर विधानसभेला चित्र वेगळे दिसले असते. काल लागलेल्या निकालांमध्ये एमआयएमने 2 जागा जिंकल्या आहेत. या जागांवर एमआयएमचाच आमदार होता. तर वंचितला भोपळाही फोडता आलेला नाही. 


असे असले तरीही या दोन्ही पक्षांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. भाजपाला कालच्या निकालामध्ये 105 जागा, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 44 आणि राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. मनसेचा एकमेव उमेदवार जिंकला आहे. यानुसार युतीचे 161 आणि 98 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता होती. वंचित आणि एमआयएमने काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाडलेल्या जागा पाहता युतीला बहुमत गाठणे कठीण गेले असते. युती बहुमतापासून 16 जागांनी पुढे आहे. 


या दोन पक्षांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तब्बल 23 जागा गमवाव्या लागल्या आहेत. या जागांवर जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विजय झाला असता तर त्यांच्या 121 जागा झाल्या असत्या आणि युतीच्या 138 जागा. असे झाले असते तर सत्तेची समीकरणे बदलली असती. मुख्यमंत्र्यांनी कालच पत्रकार परिषदेत 15 अपक्ष आमदार संपर्कात असल्याचे सांगितले आहे. या अपक्षांचा भाव वधारला असता. सध्या 28 अपक्ष व इतर निवडून आले आहेत. 


कोणत्या जागा गमावल्या? 

  • काँग्रेस : चिखली, खामगाव, अकोला पश्चिम, धामनगाव रेल, चिमुर, राळेगाव, अर्णी, फुलंब्री, चांदिवली, शिवाजीनगर, पुणे कँटेन्मेंट, तुळजापूर
  • राष्ट्रवादी : चाळीसगाव, जिंतूर, घणसावंगी, पैठण, नांदगाव, उल्हासनगर, दौंड, खडकवासला, गेवराई, उस्मानाबाद, माळशिरस
Web Title: maharashtra election 2019: Congress, NCP lost 23 seats because of Vanchit Bahujan Aghadi, MIM; BJP Shivsena will not in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.