मुंबई, दि. ३ - सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली. एका व्हॅनची किंमत चाळीस लाखाच्या वर होऊ शकत नाही. या व्हॅनमधील यंत्रं ही १२ लाखाच्या किंमतीपेक्षा अधिक नाही. अस असताना वाहने खरेदी करताना अधिकच्या किंमतीने घेण्यात आली आहेत. कॅन्सरसारखा जीवघेणा आजार आहे त्याच्या संबंधित व्हॅन आहेत, त्यातील काही यंत्र बंद पण पडली आहेत. या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, याबाबत चौकशी सुरू आहे. अजून अहवाल देखील आला नाही, मग नेमकी काय सुरू आहे? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अधिवेशन संपण्याच्या आत हा अहवाल सभागृहासमोर मांडला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी या प्रकरणी चौकशी अधिवेशन संपण्याच्या आत पूर्ण करून अहवाल सदना समोर मांडण्याचे निर्देश दिले.