‘गझनीच्या महमूदप्रमाणेच मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:44 IST2026-01-18T16:43:36+5:302026-01-18T16:44:17+5:30
Harshvardhan Sapkal Criticize Narendra Modi: सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

‘गझनीच्या महमूदप्रमाणेच मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
मुंबई - सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. भाजपा व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत, म्हणूनच अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध केला व ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींचा ३०० वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाचा हा दुटप्पीपणा जनतेनेसमोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा गंभीर आरोप करून अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजपा व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला आहे.
यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यावेळी म्हणाले की, अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये वाराणसीत मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर १० जानेवारी रोजी भाजपा सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला. यावेळी अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. २७ तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावर बुलडोझर चालवून धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार गोपीचंद पडळकरसारखे धनगर समाजाचे नेते म्हणवणारे गप्प कसे बसले, असा सवाल प्रा. यशपाल भिंगे यांनी विचारला.