लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जवळपास सात वर्षांपासून शरद पवार गटाच्या प्रदेशध्यक्षपदाची धुरा वाहणारे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करू. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. या संधीचे १०० टक्के सोने करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.
बैठकीत शिंदेंच्या नियुक्तीची घोषणा करताना शरद पवार यांनी माथाडी कामगाराचा मुलगा राज्यात पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगितले. जयंत पाटील यांनी अडचणीच्या काळात साथ दिली, अहोरात्र कष्ट केले, अशी प्रशंसा पवार यांनी केली. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात हा शेवट नाही, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे..! ही कविता वाचून दाखवली.
जातो आहे, पण सोडत नाहीमी गेल्या २५ वर्षांपासून या पक्षात काम करत आहे. शरद पवार यांचा निर्णय मी नेहमीच अंतिम मानला आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे काही नाही असे म्हणत जयंत पाटील यांनी पक्ष सोडून भाजपत जाणार या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला. मी जातो आहे, पण सोडत नाही, असेही ते म्हणाले.
भावुकही झाले माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला. गेल्या ७ वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही ते सांगितलं, असे म्हणताना जयंत पाटील भावुक झाले. त्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला.