संवाद प्रस्थापित करणार

By Admin | Updated: September 14, 2016 06:07 IST2016-09-14T06:07:19+5:302016-09-14T06:07:19+5:30

मराठा समाजातर्फे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार, तसेच विविध पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

Installing the dialog | संवाद प्रस्थापित करणार

संवाद प्रस्थापित करणार

मुंबई : मराठा समाजातर्फे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार, तसेच विविध पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
राज्यात अतिशय शिस्तबद्ध रीतीने मोर्चांचे आयोजन झाले. त्यात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्रित आले. अतिशय शांततेने आणि ज्या प्रगल्भतेने हे मोर्चे झाले, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले. सध्या निघत असलेले हे मोर्चे मराठा समाजातील अनेक वर्षांच्या आक्रोशाचे प्रतिबिंब असून, राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांना संबोधित करताना सांगितले. हा आक्रोश दूर करण्यासाठी विविध स्तरावर संवाद प्रस्थापित करण्याचा मनोदयसुद्धा त्यांनी बोलून दाखिवला.
बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या आणि आगामी काळात होऊ घातलेल्या मोर्चासंदर्भात, तसेच समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार अतिशय सकारात्मक आहे. मात्र, राज्यातील जातीय तणाव वाढू न देता, सामाजिक विषय संवादाने सुटावेत, यासाठी सरकारमधील विविध मंत्री, विविध राजकीय पक्षांचे खासदार-आमदार, ज्येष्ठ नेते, प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी, विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटना यांच्याशी आगामी काळात अधिक संवाद साधून प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Installing the dialog