जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:07 IST2025-05-22T11:05:30+5:302025-05-22T11:07:34+5:30
Maharashtra Politics: जयंत पाटील आले असते तर भाजपाच्या वाट्याचे मंत्रीपद त्यांना देण्यात येणार होते, असे म्हटले जात आहे.

जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
Maharashtra Politics: मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यभरातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यापासून सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मतदान होऊ शकते, असा कयास आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वापसी झाली असून, यापूर्वी पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून, ५० हून अधिक माजी नगरसेवक, राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. भाजपामध्येही इन्कमिंग सुरू आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील भाजपामध्ये येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. परंतु, सध्या तरी तसे काही चित्र नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबतही चर्चा सुरू होत्या. पण, त्यालाही कुठेतरी पूर्णविराम मिळताना पाहायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना अचानक अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या शपथविधीची घोषणा झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.
जयंत पाटलांसाठी होते थांबले, भाजपाचे चर्चेचे घोडे अडले
मिळालेल्या माहितीनुसार, राजभवन येथे मंगळवारी केवळ छगन भुजबळ यांचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक आणि भाजपाची एक अशा दोनच जागा रिक्त होत्या. गेले काही दिवस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना महायुतीकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी चर्चा आहे. ते भाजपामध्ये आले असते तर भाजपाच्या वाट्याचे मंत्रीपद पाटील यांना देण्यात आले असते. मात्र ते कुठल्याही आमिषाला बधले नाहीत आणि अखेर राष्ट्रवादीच्या रिकाम्या जागी अजितदादांना नाईलाजाने छगन भुजबळांना बसवावे लागले, अशी चर्चा आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अनेक नवनवीन खुलासे झाल्यानंतर विरोधकांच्या मागणीसमोर महायुती सरकारला झुकावे लागले आणि अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ज्या पद्धतीने हे हत्याकांड घडवले गेले, ते पाहून संपूर्ण राज्य हादरले. धनंजय मुंडे यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, अशी चर्चा सुरू होती. तत्पूर्वी, पहिल्या मंत्रिमंडळात समावेश न केल्याबाबत छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांवर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मानापमान नाट्यानंतर अखेरीस मंत्रिपदाची माळ छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडली.