'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 10:33 IST2025-04-28T10:32:03+5:302025-04-28T10:33:08+5:30
Yogesh Kadam Nitesh Rane News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांमध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी योगेश कदम यांना नाव न घेता डिवचलं. राणेंच्या विधानावरून योगेश कदम यांनी स्पष्ट शब्दात सुनावलं.

'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
Mahayuti Yogesh Kadam Nitesh Rane: दापोलीत दोन गटात झालेल्या वादाच्या मुद्द्यावरून आता महायुतीतील दोन मंत्र्यांमध्येच संघर्षाची ठिणगी पडली आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दापोलीत जाऊन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. राणेंनी केलेल्या टिकेनंतर कदमही चांगलेच भडकले. आम्ही हाती घेतलेला झेंडा कधीच खाली ठेवला नाही. मला शहाणपणा शिकवू नका, असे म्हणत कदमांनी राणेंना खडेबोल सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दापोलीत काही महिन्यांपूर्वी दोन गटांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला. पण, काही लोकांची नावे त्यात नसल्याच्या मुद्द्यावरून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली.
योगेश कदमांचं नाव न घेता नितेश राणे काय बोलले?
"गृहमंत्री खातं आमच्या देवेंद्र फडणवीसांकडे आहे. एफआरआयमध्ये आज नाव आलं नसेल. कोण असेल वाचवणारे, कुठे बसलेले. पण, ते आमच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत. संबंधित खात्यातील लोकांनी लक्षात घ्यावं", असा इशाराच नितेश राणेंनी योगेश कदमांना दिला.
हेही वाचा >> वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
"उद्या जेव्हा फडणवीसांकडे हा विषय जाईल. तेव्हा उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तेव्हा तुम्हाला जे वाचवायला, फोन करायला आले होते ना. ते सगळे फोन बंद करून बसतील, हे लक्षात ठेवा", असे विधान नितेश राणेंनी केलं.
मला शहाणपणा शिकवायची गरज नाही -योगेश कदम
नितेश राणेंनी इशारा दिल्यानंतर योगेश कदमही भडकले. ते म्हणाले, "त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा, हे मला समजतं."
"आम्ही जन्मापासून शिवसेनेत आहोत. बाळासाहेबांचे बाळकडू आम्हाला मिळालं आहे. आमच्या हातामधील झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही. यावरून त्यांनी समजून घ्यावं. आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे. उद्याही भगवा झेंडा राहणार", अशा शब्दात योगेश कदमांनी राणेंना डिवचलं.