‘EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेतले’, सुनील शेळकेंचा भाजपाच्या नेत्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 08:45 IST2026-02-17T08:43:25+5:302026-02-17T08:45:31+5:30
Sunil Shelke News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे.

‘EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेतले’, सुनील शेळकेंचा भाजपाच्या नेत्यावर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान EVM हॅक करून विजय मिळवून देतो, असे आमिष दाखवून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या उमेदवारांकडून प्रत्येकी २५ लाख रुपये उकळले, असा सनसनाटी आरोप सुनील शेळके यांनी केला आहे.
मावळमधील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर हा आरोप केला. ते म्हणाले की, या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवेळी मतदानाच्या तीन चार दिवस आधी हे नेते एका ईव्हीएम हॅक करणाऱ्याला घेऊन आले. यांचे खिसे भरले नाहीत, यांचं पोट भरलं नाही, म्हणून यांनी उमेदवारांकडून पैसे घेतले. ईव्हीएम हॅक करून तुम्हाला विजय मिळवून देतो म्हणून सांगून यांनी एका एका उमेदवाराकडून प्रत्येकी २५ लाख रुपये गोळा केले.
आता या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणीदेखील सुनील शेळके यांनी केली आहे. ते म्हणाले की, मी या प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, यासाठी मागणी करणार आहे. भाजपाचे मावळातले नेते आम्ही ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजय मिळवून देऊ असे उमेदवारांना सांगतात , असे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. तसेच या माध्यमातून २५-२५, ३५-३५ लाख रुपये उकळणाऱ्या नेत्यांची चौकशी करा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असेही सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले.