कऱ्हाडात विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांचे धरणे आंदोलन, नेमक्या मागण्या काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:40 IST2025-07-08T17:39:02+5:302025-07-08T17:40:03+5:30
थकलेल्या वेतनाबरोबरच इतर मागण्या मान्य करण्याची मागणी

छाया-प्रमोद सुकरे
कऱ्हाड : राज्यातील गटसचिव कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात ५० वर गटसचिव सहभागी झाले आहेत.
राज्यातील सेवा सहकारी संस्थेवर कार्यरत असणाऱ्या सुमारे २,५०० गटसचिवांचे गेले १० ते ११ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. यासंदर्भात प्रशासन व राज्यकर्त्यांकडे निवेदने देऊन पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतलेली नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे. म्हणूनच कऱ्हाड येथील प्रीतिसंमावर हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे संघटनेचे रवींद्र काळे-पाटील व राजेंद्र तिडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अशा आहेत प्रमुख मागण्या
- गटसचिवांच्या थकीत व नियमित वेतनासाठी तत्काळ निधी मंजूर करावा.
- ग्रामसेवकांप्रमाणे अद्ययावत वेतनश्रेणी गटसचिवांनाही लागू करावी.
- संस्था नियुक्त सचिवांचे सेवा नियमन व वेतन नियमित करून शासकीय केडरमध्ये त्यांचे समायोजन करावे.
- सेवा सहकारी संस्थांचे मागील ५ वर्षांपासूनचे थकीत असणारे सक्षमीकरण अनुदान तत्काळ अदा करावे.
नियमित वेतनासाठी देखील आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. मात्र, याबाबत कोणीही लक्ष देत नाही. म्हणूनच सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. - रवींद्र काळे-पाटील, आंदोलक