धान्याचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय गोदामांना ताडपत्र्या मिळणार

By Admin | Updated: June 28, 2014 23:42 IST2014-06-28T22:57:20+5:302014-06-28T23:42:38+5:30

एक कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता : अन्न व पुरवठा विभागाचा निर्णय

Government warehouses will get Tadaprite to avoid loss of money | धान्याचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय गोदामांना ताडपत्र्या मिळणार

धान्याचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय गोदामांना ताडपत्र्या मिळणार

वाशिम : राज्यातील शासकीय गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या धान्याचे नुकसान टाळण्यासाठी प्लॉस्टिकच्या ताडपत्र्या देण्यात येणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यासाठी एक कोटी रूपयांपर्यंतच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
पावसापासून आणि तीव्र उन्हापासून धान्याचे संरक्षण न केल्यामुळे, शासकीय गोदामातील धान्याचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. धान्य सडून, जनावरांसाठीही खाण्यायोग्य न राहिल्यामुळे ते नष्ट करावे लागते. धान्याचे हे नुकसान टाळण्यासाठी शासकीय गोदामांना आयएसआय दर्जाच्या प्लास्टिकच्या ताडपत्र्या पुरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांमधील शासकीय गोदामांना आवश्यक असलेल्या प्लास्टिक ताडपत्र्यांबाबतची माहिती पुरवठा आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्ह्यांकडून मागविली होती. आयुक्त कार्यालयाने ३१६१ प्लास्टिक ताडपत्र्यांचे मागणीपत्र शासनास यापूर्वीच सादर केले होते. त्यानुसार उद्योग संचालनालयाने मुंबई येथील मे. रेनप्रुफ एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी ताडपत्र्या खरेदीचा दरकरार केला होता. त्या कराराची मुदत ३0 जून २0१४ पर्यंत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येकी ३६ चौरस मीटर आकाराच्या ३१६१ ताडपत्र्या प्रत्येकी ३४४५ रुपये या दराने खरेदी करण्यासाठी १ कोटी ८ लाख ९0 हजार २७३ रुपयांचा निधी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही खरेदी होऊन सर्व शासकीय गोदामांना ताडपत्र्यांचा पुरवठा लवकरच होणार आहे.

Web Title: Government warehouses will get Tadaprite to avoid loss of money