नाव बदलण्यापेक्षा पाणी द्या !

By Admin | Updated: September 2, 2015 01:20 IST2015-09-02T01:20:07+5:302015-09-02T01:20:07+5:30

औरंगाबाद शहराचे नाव बदलविण्याचा विचार सध्या बोलला जात आहे. पण अकारण एखाद्या शहराचे नाव बदलणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे.

Give water than renaming! | नाव बदलण्यापेक्षा पाणी द्या !

नाव बदलण्यापेक्षा पाणी द्या !

नागपूर : औरंगाबाद शहराचे नाव बदलविण्याचा विचार सध्या बोलला जात आहे. पण अकारण एखाद्या शहराचे नाव बदलणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे. असा इतिहास बदलणे मला मान्य नाही. त्यापेक्षा तेथील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करा, असे रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
नागपुरात आले असताना ते म्हणाले, की साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही नाही. हा आरोप निराधार आहे. मला संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्याची अटच टाकली आणि विनंती, आग्रह झालाच तर मला अध्यक्ष व्हायला आवडेल. पण ते संमेलन अखेरचे असले पाहिजे.
साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर कुणी करीत असेल तर असे म्हणणारे लोक किती भित्रे आहेत, ते समजून घेण्याची गरज आहे. मी साधा, सरळ माणूस आहे. मी बोललो की वाद होतो, पण मी स्वत:हून बोलत नाही. कुणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मी देतो.
लाखावर वेतन घेणाऱ्या प्राध्यापकांनी त्यांच्या विषयाचे ज्ञान मराठीत आणल्याशिवाय त्यांना निवृत्तीवेतन देऊ नये, असा आदेशच शासनाने काढायला हवा. त्याशिवाय वैश्विक ज्ञान मराठीत येणार नाही. हिंदू कादंबरीच्या ४५ हजार प्रती विकल्या़ यातून वाचन वाढते आहे, हे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.

मलाही ठार माराल का ?
दाभोलकर, पानसरे आणि आता कर्नाटकातील विचारवंत कलबुर्गी यांची हत्या होण्यामागे काही षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे तालिबान आहे की पाकिस्तान? मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का? गांधी, फुले, आंबेडकरांचे विचारही लोकांना पटले नव्हते; पण त्यांच्याच विचारातून क्रांती झाली, हे नाकारता येत नाही. पोलिसांनी संबंधित हत्या प्रकरणांची चौकशी केल्याशिवाय त्यांचे वेतनच द्यायला नको, असे नेमाडे म्हणाले.

Web Title: Give water than renaming!