वन विभाग ‘आॅनलाईन’ होणार

By Admin | Updated: May 28, 2014 01:06 IST2014-05-28T01:06:34+5:302014-05-28T01:06:34+5:30

सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात प्रत्येक शासकीय विभाग ‘हायटेक’ होण्याचा प्रयत्न करू लागला आहे. यात वन विभागाने एक पाऊल पुढे टाकून ‘पेपरलेस’ होण्याचा निर्णय घेतला आहे.

Forest Department will be 'online' | वन विभाग ‘आॅनलाईन’ होणार

वन विभाग ‘आॅनलाईन’ होणार

वन अधिकार्‍यांना ई-प्रणालीचे धडे : वन मुख्यालयापासून सुरुवात

नागपूर : सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात प्रत्येक शासकीय विभाग ‘हायटेक’ होण्याचा प्रयत्न करू लागला आहे. यात वन विभागाने एक पाऊल पुढे टाकून ‘पेपरलेस’ होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संपूर्ण वन विभागात ई-आॅफिस प्रणाली कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, वन विभागाच्या संगणकीकरणासाठी आयसीटी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. ई-आॅफिस हा त्याचाच एक भाग मानल्या जात आहे. पहिल्या टप्प्यात वन मुख्यालयात ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राकडून वन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे डिजिटल सिग्निचर सर्टिफिकेट (डीएससी) तयार करून, संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक ऋषी मौर्या यांना आमंत्रित करून वनभवन येथे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गत २६ मेपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणात आतापर्यंत सुमारे १५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रशिक्षण घेतले आहे. शिवाय उद्या (बुधवारी) या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस असून, यात वन मुख्यालयातील सर्व वरिष्ठ वनाधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे. या ई-प्रणालीमध्ये वन विभागातील विविध नस्ती/दस्तऐवज आॅनलाईन करणे अपेक्षित आहे. यात अधिकारी व कर्मचार्‍यांची जबाबदारी निश्चित झाल्याने प्रशासकीय कामाला गती मिळणार आहे, तसेच कामकाज अधिक पारदर्शी व लोकाभिमुख होण्यास मदत मिळेल. राज्य शासनातर्फे सर्व शासकीय विभागातील कामकाज पारदर्शी व लोकाभिमुख करण्याचा मानस राहिला आहे. त्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ई-प्रणालीचा प्रयोग राबविला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Forest Department will be 'online'