ओएनजीसी जहाजाच्या इंजिन रूमला आग

By Admin | Updated: June 1, 2015 05:05 IST2015-06-01T05:05:08+5:302015-06-01T05:05:08+5:30

ओएनजीसीच्या पुरवठा जहाजातील इंजिन रुमला रविवारी दुपारी मोठी आग लागली. तटरक्षक दलाच्या मदतीने ही आग पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझविण्यात आली.

Fire on ONGC's shipyard engine | ओएनजीसी जहाजाच्या इंजिन रूमला आग

ओएनजीसी जहाजाच्या इंजिन रूमला आग

मुंबई : ओएनजीसीच्या पुरवठा जहाजातील इंजिन रुमला रविवारी दुपारी मोठी आग लागली. तटरक्षक दलाच्या मदतीने ही आग पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझविण्यात आली. या जहाजावरील ३३ कर्मचाऱ्यांची सुखरुपपणे सुटका करण्यात आल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले.
ओएनजीसीच्या वेस्टफोन या जहाजातून ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थ, सुटे भाग, इंधन आणि अन्य वस्तू पुरविल्या जातात. हे जहाज मुंबई पश्चिमेपासून २00 किलोमीटर अंतरावर असताना रविवारी दुपारी २.२0 च्या सुमारास इंजिन रुमला अचानक आग लागली. यावेळी या जहाजावर ३३ कर्मचारी कार्यरत होते. याची माहिती तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला मिळताच तात्काळ दमण हवाई तळावरुन विमान मागविण्यात आले. तर त्याच परिसरातील ओसव्ही बीस नेगी आणि ओशियन डायमंड या जहाजांशीही संपर्क साधून त्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. याचवेळी ओसव्ही ग्रेट अहिल्या हे जहाजही मदतीला आले. वेस्टफोन जहाजावरील इंजिनाला लागलेल्या आगीने काही तासांतच रौद्ररुपही धारण केले. अन्य जहाजाच्या मदतीने ती विझविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच जहाजावरील ३३ कर्मचाऱ्यांपैकी २८ जणांना बाहेर काढण्याचे काम केले जात होते.
या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून अहिल्यावर २१, ओशियन डायमंड जहाजावर दोन तर नेगी जहाजावर पाच कर्मचाऱ्यांना सुखरुपपणे पोहोचविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Fire on ONGC's shipyard engine