पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:08 IST2019-07-14T20:04:02+5:302019-07-14T20:08:08+5:30

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़.

even after one and a half months of rainy season 24 districts have reduced rainfall | पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्हे पावसाच्या प्रतिक्षेतपावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

पुणे : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़. मराठवाड्यात ३१ टक्के तर विदर्भात ३० टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. त्यामुळे या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या असून जेथे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांचे आता पावसासाठी आकाशाकडे डोळे लागले आहेत़. 
राज्यात सध्या केवळ कोकण, गोव्यात प्रामुख्याने पाऊस सर्वदूर होत असून मध्य महाराष्ट्रातील घाटमथ्यावरील भागात पाऊस आहे़.  मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे़ कोकण, गोव्यात सरासरीच्या २० टक्के पाऊस अधिक झाला आहे़.  
मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असली तरी अहमदनगर (८ टक्के), पुणे (७५ टक्के), सातारा (२१टक्के), कोल्हापूर (२६ टक्के) या जिल्ह्यात जादा पावसाची नोंद झाली आहे़.  सोलापूरला तब्बल (-५० टक्के), सांगली (-१५ टक्के) कमी पाऊस झाला आहे़. उत्तर महाराष्ट्रातील केवळ नाशिक जिल्ह्यात २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून नंदुरबार (- ३६ टक्के), जळगाव (-१७ टक्के), धुळे (-१६ टक्के) या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़. 
मराठवाड्यात १ जून ते १४ जुलै अखेर सरासरीपेक्षा तब्बल ३१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे़.  हिंगोली (- ४६ टक्के) व नांदेड (- ४५ टक्के) या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून बीड (-३७ टक्के), परभणी (-३४ टक्के), उस्मानाबाद (-२६ टक्के), लातूर (-३२ टक्के), जालना (-१७ टक्के), औरंगाबाद (-८ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे. 
संपूर्ण विदर्भात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला़. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते़. मात्र, त्याचा सर्व रोख हा ओडिशा व मध्य प्रदेशाच्या दिशेने राहिल्याने बुलढाणा वगळता विदर्भाला त्याचा जास्त फायदा होऊ शकला नाही़. विदर्भातील यवतमाळ (-५१ टक्के), वर्धा (-४३ टक्के), वाशिम (-४१ टक्के), अमरावती (- ३९ टक्के), भंडारा (- ३१ टक्के), अकोला (- २८ टक्के), चंद्रपूर (-२३ टक्के), गोंदिया (-३७ टक्के), नागपूर (-२६ टक्के), गडचिरोली (- २० टक्के) या जिल्ह्यात पावसाची नितांत गरज आहे़. केवळ बुलढाणा (-३ टक्के) सरासरीच्या जवळपास पाऊस आतापर्यंत झाला आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याने मराठवाडा व विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती नाही़. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील खरीप पेरण्यांवर त्याचा प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: even after one and a half months of rainy season 24 districts have reduced rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.