भाषा, गणितासारख्या विषयातूनही मिळणार पर्यावरण शिक्षण

By Admin | Updated: June 29, 2014 00:52 IST2014-06-29T00:39:05+5:302014-06-29T00:52:15+5:30

पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

Environmental education can also be obtained from topics like language, mathematics | भाषा, गणितासारख्या विषयातूनही मिळणार पर्यावरण शिक्षण

भाषा, गणितासारख्या विषयातूनही मिळणार पर्यावरण शिक्षण

अकोला : पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. लहान मुलांमध्ये जर पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले गेले, तर निश्‍चितच पर्यावरण संरक्षणाला हातभार लागू शकतो याची जाणीव झाल्यामुळेच शासनाने अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय ठेवला आहे. आता भाषा आणि गणितासारख्या विषयांमधूनदेखील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी यंदा तयार करण्यात आलेल्या तिसरी आणि चौथीच्या भाषा आणि गणिताच्या पुस्तकात पर्यावरणावर अधिक भर देण्यात आला आहे. बालभारतीच्या तिसरी आणि चौथीच्या गणिताच्या पाठय़पुस्तकांमधील उदाहरणांमध्ये फळे, फुले, भाज्या, शेते, पाणी, बियाणे, बागेतील झाडे, बागेत खेळणारी मुले यांचा उल्लेख करण्यात आला आहे. गणिताची उदाहरणे सोडवताना जांभूळ, चिंचोके यांच्यासह विविध फळांच्या बिया, फुले यांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थी आणि पालकांना उद्युक्त करण्यात आले आहे. मराठीच्या पाठय़पुस्तकात झाडे आणि पशुपक्षी यांच्यावर प्रेम करणे, त्यांची काळजी घेणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे, कचर्‍याचे व्यवस्थापन करणे अशा मूल्यांचा संदेश देणारे पाठ समाविष्ट करण्यात आले आहेत. इंग्रजीच्या पाठय़पुस्तकात झाडांचे महत्त्व, त्यांचे संगोपन याविषयीच्या कविता आणि कथांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणप्रेमी मंडळे तयार करावीत, घोषवाक्ये लिहावीत, बिल्ले तयार करावेत, असे रंजक उपक्रमही करण्यास सांगण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विज्ञान, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांसाठी परिसर अभ्यासाचे एक पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे. तसेच तिसरीचा इतिहास हा विषयही परिसर अभ्यासातच समाविष्ट करण्यात आला आहे. परिसर अभ्यासाच्या पुस्तकांचा मुख्य भर पर्यावरण शिक्षणावरच देण्यात आला आहे. पाणी ही नैसर्गिक संपत्ती, निसर्गाविषयी आदर असे विविध मुद्दे मांडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व माहिती ह्यमाहीत आहे का तुम्हालाह्ण, ह्यजरा डोके चालवाह्ण अशा लक्षवेधी शीर्षकाखाली आणि लहान मुलांना सहज समजेल अशा शब्दात देण्यात आली आहे.

Web Title: Environmental education can also be obtained from topics like language, mathematics