जिल्हा परिषद सभेत फोडली अंडी !

By Admin | Updated: December 20, 2014 00:46 IST2014-12-20T00:46:46+5:302014-12-20T00:46:46+5:30

कुक्कुटपालन योजनेसाठी अतिरिक्त निधीच्या मुद्दय़ावर विरोधक आक्रमक.

District council meeting broke down | जिल्हा परिषद सभेत फोडली अंडी !

जिल्हा परिषद सभेत फोडली अंडी !

अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत अंडी उबवणी यंत्र आणि कुक्कुटपालन योजना राबविण्याकरिता अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या विषयावर शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या मुद्दय़ावर आक्रमक पवित्रा घेतला. त्यावरून सभेत झालेल्या प्रचंड गोंधळात संतप्त झालेल्या काही महिला सदस्यांनी सभेत चक्क अंडी फोडली.
जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर अंडी उबवणी यंत्र संच पुरविणे आणि कुक्कुटपालन योजना राबविण्याकरिता अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या विषयावर शुक्रवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. या योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवलेले पत्र वाचून दाखविण्याची मागणी विरोधी पक्षनेता रमण जैन, सदस्य ज्योत्स्ना चोरे यांच्यासह विरोधी गटाच्या सदस्यांनी सभेच्या प्रारंभी केली. नितीन देशमुख, चंद्रशेखर पांडे व इतर सदस्यांनीही या विषयावर आक्षेप घेत चर्चा करण्याची मागणी केली. या मुद्दय़ावर चर्चा खूप झाली, आता मतदान घ्या, अशी मागणी सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी केली. दुसरीकडे या मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी विरोधी गटाच्या सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे या मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच काळ गोंधळ झाला. या गोंधळाच्या वातावरणात आक्रमक पवित्रा घेतलेल्या ज्योत्स्ना चोरे व काही महिला सदस्यांनी सभागृहात अध्यक्ष, पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दिशेने भिरकावत, सभेत चक्क भिंतीवर अंडी फोंडली.

Web Title: District council meeting broke down