'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:35 IST2025-01-29T15:33:24+5:302025-01-29T15:35:47+5:30
महायुतीतील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू
Dhananjay munde on resign: संतोष देशमुख हत्या आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येचे प्रकरण समोर आल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात ढकलला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संबंधित प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणताहेत की, वाल्मीक कराडच्या जवळचे आहात. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे आहात, त्यामुळे तुमचा राजीनामा होणार नाही, असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारण्यात आला.
धनंजय मुंडेंनी राजीनाम्याच्या मागणीवर मांडली भूमिका
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "याबाबतीत धनंजय मुंडे यासर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) कुठे जर दोषी वाटत असतील, तर त्यांनी राजीनामा मागावा; मी राजीनामा देणार. पण, फक्त हा विषय काढून राजीनामा होत असेल, याबाबतीत मी दोषी आहे की नाही; हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे ना", अशी भूमिका धनंजय मुंडेंनी मांडली.
"51 दिवस... ज्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. टार्गेट मी आहे. मी पक्षाचा निष्ठावंत आहे. महायुतीच्या प्रचारातील प्रमुख व्यक्ती आहे. आपण निवडणुकीत टीका करतो. टीका सहनही करतो. पण, याबद्दलचा राग पुन्हा नसतो", असे धनंजय मुंडे म्हणाले.
वरिष्ठांनी मला सांगावं -धनंजय मुंडे
नैतिकता म्हणून राजीनामा देऊन चौकशी होईपर्यंत बाजूला राहायला पाहिजे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, "माझी नैतिकता माझ्या लोकांच्याबद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीये, त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय, ते अतिशय प्रामाणिक आहे. त्यामुळे मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही. त्यामुळे माझा दोष सांगावा लागेल. माझ्या वरिष्ठांनी सांगावा लागेल. तेच माझं म्हणणं आहे", असे भाष्य धनंजय मुंडे यांनी केले.