"कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे ..."; अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस भरभरून बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 21:40 IST2026-02-22T21:39:14+5:302026-02-22T21:40:13+5:30
Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Budget 2026: सुनेत्रा पवार यांच्याबद्दलही फडणवीसांनी विधान केले.

"कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे ..."; अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस भरभरून बोलले
Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीसांनी अजितदादांबाबत भावना व्यक्त केल्या.
"अर्थसंकल्पीय अधिवेशन हे असे माध्यम असते, ज्यातून सरकार सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते. अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाकरिता प्रचंड तयारी केली होती आणि चांगला अर्थसंकल्प द्यायचा त्यांचा मानस होता. दुर्दैवाने हा अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थखातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते. कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ते सातत्याने पाळायचे. कधीही बेशिस्त कारभार ते चालवून घेत नव्हते. ते अर्थमंत्री असताना आम्ही कोणत्याही आर्थिक शिस्तीच्या बाहेर जात असू तर ते आम्हाला स्पष्टपणे सांगायचे की हे आर्थिक शिस्तीत बसत नाही. पण त्यासोबतच जिथे आवश्यक होते तिथे ते मार्ग देखील काढून देत होते. अशा पद्धतीचे अजितदादा या वेळेस आपल्यात नाहीत याची कमतरता जाणवेल," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल...
"सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोऱ्या जात आहेत. राज्यसभेचा त्यांना अनुभव आहे. विधानसभेला त्या पहिल्यांदाच येत आहेत. पण मला विश्वास आहे की त्यांचा जो अनुभव आहे, त्यामुळे त्यादेखील अतिशय ठामपणे भूमिका मांडतील आणि अधिवेशनाला सामोऱ्या जातील," असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पात काय-काय?
"या अधिवेशनाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या प्रश्नांची सोडवणूक आम्ही करू. देशातील सर्वाधिक दिवस अधिवेशन हे महाराष्ट्रात होते. केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीमध्ये २० हजार कोटींची वाढ झाली आहे. तर महाराष्ट्राला ९८३०० कोटी रुपयांचा कर परतावा मिळणार आहे. दावोसमध्ये ३० लाख कोटींचे करार करण्यात आले. त्याबाबत सविस्तर विवेचन अर्थसंकल्पात केले जाईल. महाविस्तार नावाचे AI अँप तयार करण्यात आले असून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. पिकाचा फोटो काढला तरी शेतकऱ्याला त्याच्या पिकाची अवस्था काय आहे, याची माहिती मिळेल," अशी माहितीही त्यांनी दिली.